![]()
भविष्यकाळ अंध:कारमय होण्यापूर्वीच मराठी शाळांच्या सुधारणेचा आग्रह धरला पाहिजे. मराठी शाळा आणि पुस्तके पुरविणारी ग्रंथालये ही मायमराठीची खरी वस्त्रे आहेत. महाराष्ट्र समृद्ध करायचा असेल तर मराठीसाठी धाडसाने काहीतरी करावे लागेल, असे प्रतिपादन ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी केले. सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील यांच्या १२६व्या जयंतीनिमित्त प्रवरा परिसरात राज्यस्तरीय साहित्य, कलागौरव व प्रबोधन पुरस्कारांचे वितरण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत झाले. अध्यक्षस्थानी विश्वास पाटील होते. यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, आमदार मोनिका राजळे, काशिनाथ दाते, आशुतोष काळे, विठ्ठलराव लंघे, संग्राम जगताप, अमोल खताळ, प्राजक्त तनपुरे आदी उपस्थित होते. यंदाचा ‘पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील साहित्य जीवनगौरव पुरस्कार’ ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांना प्रदान करण्यात आला. तसेच संहिता राजन, सुरेंद्र दरेकर, मालती इनामदार, सचिन शिंदे, मराठी अभ्यास परिषद, निवृत्ती जोरी आणि संजय गोर्डे यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. विश्वास पाटील म्हणाले, ‘इंग्रजी शाळा सोन्याच्या पिंजऱ्यातील पोपटांसारख्या आहेत; मात्र जिल्हा परिषदेच्या शाळा गरुडासारखी झेप घेत आहेत. या शाळांना भेट द्या, कारण ती आपली खरी मंदिरे आहेत. तुमच्या खांद्यावर झेंडा कोणताही असू द्या; दांडा मात्र मराठीचाच ठेवा. उपमुख्यमंत्री पवार म्हणाल्या, सहकार पंढरीचे दर्शन घेण्याचे भाग्य आज मला मिळाले. स्व. आप्पासाहेब पवार यांचा उल्लेख करून, येथील वटवृक्षाशी आमचे भावनिक, जुने आणि जिव्हाळ्याचे नाते आहे, असे त्यांनी सांगितले. विखे-पाटील परिवाराची चौथी पिढी सक्रियपणे यासाठी काम करते, ही आनंदाची बाब आहे. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी प्रवरा परिवाराच्या ३६ वर्षांच्या साहित्य पुरस्कारांच्या वाटचालीचा आढावा घेत मराठी साहित्य, कला व संस्कृतीची अभिरुची जपण्याचा संकल्प व्यक्त केला.
Source link
मराठी शाळा, ग्रंथालये मराठींची खरी वस्त्रे- पाटील:विखे-पाटील साहित्य,कलागौरव व प्रबोधनपुरस्कारांचे वितरण