Headlines

शनिदेवाच्या चरणी राखी; अनुराधा पौडवालांचा माहेरचा भावबंध:शनिदेवाला 5 ग्रॅम सोन्याची साखळी अर्पण; स्व. बाबुराव बानकर यांच्या आठवणींना दिला उजाळा‎



शिंगणापूर हे माझे माहेर आहे. शनिदेवाने आणि स्व. बाबुराव बानकर यांनी मला लेक मानले. त्यामुळे दरवर्षी रक्षाबंधनानिमित्त येथे येऊन राखी बांधते. मला माहेरची साडीही भेट दिली जाते, अशी भावना प्रसिद्ध पार्श्वगायिकाअनुराधा पौडवाल यांनी व्यक्त केली.

.

रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला पौडवाल यांनी श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर येथे शनिदेवाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी शनिदेवाला राखी आणि पाच ग्रॅम सोन्याची साखळी अर्पण केली. तसेच शनिशिंगणापूरच्या धार्मिक व सामाजिक जडणघडणीत योगदान देणारे स्व. बाबुराव बानकर यांच्याशी असलेला भावनिक ऋणानुबंध जपत त्यांनाही राखी अर्पण करून कृतज्ञता व्यक्त केली.

उदासी महाराज मठात पुरोहितांच्या हस्ते त्यांनी शनिदेवाचा तैलाभिषेक केला. त्यानंतर शनी चौथऱ्याखालील देवाचे औक्षण करून राखी व सोन्याची साखळी अर्पण केली. यावेळी त्यांच्यासोबत अॅड. आश्लेषा गोवारीकर उपस्थित होत्या. रक्षाबंधनानिमित्त शनिशिंगणापूरला येण्याची आपली परंपरा असल्याचे पौडवाल यांनी सांगितले.

सन १९९२ मध्ये त्यांनी शनिदेवाच्या भजनांची मराठी ध्वनिफीत प्रसिद्ध केली होती. त्यानंतर १९९५ मध्ये शनिदेवाच्या लीलांवर आधारित ‘सूर्यपुत्र शनिदेव’ चित्रपटाची निर्मिती केली. त्यामुळे त्यांचे शनिदेवाशी असलेले नाते श्रद्धा आणि कलेशी जोडले गेले आहे. दर्शनानंतर देवस्थानच्या वतीने पोलfस पाटील अॅड. सयाराम बानकर व कार्यालयीन अधीक्षक लक्ष्मण वाघ यांनी त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. “शनिदेव विश्वाचे न्यायदेवता असून चांगल्या कर्माला चांगले फळ, तर वाईट कर्माला शिक्षा मिळते, असेही पौडवाल यांनी सांगितले. यावेळी भाऊसाहेब बानकर, नामदेव वरुडे, किशोर मगर, धर्मेंद्र काकडे उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *