Headlines

राहुरीला रेल्वे ‘थांबे’ मिळणार?:बंद पॅसेंजर पुन्हा सुरू करण्याची मागणी




प्रतिनिधी |राहुरी राहुरी रेल्वे स्थानकावर प्रमुख रेल्वे गाड्यांना थांबा देण्यासह बंद असलेल्या पॅसेंजर रेल्वे सेवा पुन्हा सुरू कराव्यात, अशी मागणी राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अक्षय कर्डिले यांनी मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांकडे केली आहे. आ. कर्डिले यांनी दिलेल्या पत्रात पुणे-जम्मू तवी झेलम एक्सप्रेस, महाराष्ट्र एक्सप्रेस आणि पुणे-अमरावती एक्सप्रेस या महत्त्वाच्या गाड्यांना राहुरी स्थानकावर थांबा देण्याची मागणी केली आहे. तसेच बंद असलेल्या पुणे-नांदेड, पुणे-मनमाड आणि शिर्डी-पंढरपूर पॅसेंजर सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी राहुरी स्थानकावर तिकीट आरक्षणाची सुविधा सुरू करावी, तसेच पादचारी उड्डाणपूल उभारावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. स्थानकावर आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध झाल्यास नागरिकांची गैरसोय दूर होऊन रेल्वे प्रवासाला अधिक चालना मिळेल, असे त्यांनी नमूद केले. राहुरी परिसरात शनि शिंगणापूर व शिर्डी ही प्रमुख धार्मिक स्थळे, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, साखर कारखाने, मुळा धरण तसेच पर्यटनस्थळे आहेत. त्यामुळे विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी, भाविक व पर्यटकांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. प्रमुख गाड्यांना थांबा नसल्याने प्रवाशांना अन्य स्थानकांवर जावे लागते. त्यामुळे वेळ व आर्थिक खर्च वाढत असून राहुरीला रेल्वे सुविधा वाढविण्याची गरज असल्याचे आ. कर्डिले यांनी म्हटले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *