![]()
घातक रासायनिक केमिकल व पावडरची अवैध विल्हेवाट लावणाऱ्या बहुराज्यीय सिंडिकेटचा मुख्य सूत्रधार इस्तेकार अहमद निसार खान (३८, रा. बलरामपूर, उत्तर प्रदेश) याला सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी नेपाळ सीमेलगतच्या भागातून अटक केली. गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असलेल्या मास्टरमाईंडचा तांत्रिक तपासाच्या आधारे शोध घेण्यात पोलिसांना यश आले. पळशी, फर्दापूर, आळंद, शिवूर, तोंडापूर परिसरात आढळलेल्या रासायनिक ड्रम्सपासून या तपासाला सुरुवात झाली. प्रकरणात आतापर्यंत तेलंगणा, राजस्थान व उत्तर प्रदेशपर्यंत धागेदोरे पोहचले आहेत. पोलिसांनी कारवाईत ३,५२,२२० लिटर घातक रसायन (१६०१ ड्रम), ४० टन रासायनिक पावडर, ५० टन दूषित माती, ३ ट्रक, हायड्रा मशीन आणि मोबाईल असा ८०.३५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, खानसह एकूण १२ आरोपींना अटक केली आहे. तपासात उघड झाले की, इस्तेकार खान याने मुंबईतील कामाच्या अनुभवातून हैदराबादच्या सादिक व हुसैनमार्फत तेलंगणातील आणि राजस्थानच्या कंपन्यांशी संपर्क साधला. ऑगस्ट २०२५ मध्ये सिल्लोडच्या अब्दुल गफार पठाणला सोबत घेऊन त्याने विषारी कचरा टाकण्याची जाळी तयार केली. प्रत्येक वाहनामागे दिले अतिरिक्त पैसे गेल्या १० ते १२ महिन्यांत इस्तेकारने १०० हून अधिक गाड्यांतून १० हजारांपेक्षा जास्त रासायनिक ड्रम्स आणि दूषित माती या भागात पाठवली. प्रत्येक वाहनामागे गफार पठाणला अतिरिक्त पैसे दिले जात होते. या विल्हेवाटीसाठी आरोपींमध्ये ८० लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेची देवाणघेवाण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
Source link
घातक केमिकलचा मुख्य सूत्रधार जेरबंद:इस्तेकार खानला नेपाळ सीमेलगत अटक