Headlines

दुष्काळाचे सावट:अकोलेकरांवर पाण्याचे संकट; महान धरणात 25% जलसाठा, अकोला, मूर्तिजापूरसह 64 गावांना पाणीपुरवठ्याची चिंता‎




अकोला शहरासह मूर्तिजापूर आणि ग्रामीण भागाची तहान भागवणाऱ्या महान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात यंदा पावसाने दडी मारल्याने धरणातील जलसाठा अत्यंत चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. ऑगस्ट महिना संपत आला तरी धरणात केवळ २४.९१ टक्केच उपयुक्त जलसाठा शिल्लक असून, गतवर्षीच्या तुलनेत यंदा मोठी घट नोंदवण्यात आली आहे. पावसाळ्याचे दिवस वेगाने उलटत असतानाही धरणाची पाणीपातळी वाढत नसल्याने आगामी काळात अकोलेकरांवर भीषण पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. २८ ऑगस्ट २०२६ रोजी महान धरणातील जलसाठा ३४१.५५ मीटर असून २१.५११ दशलक्ष घनमीटर म्हणजेच २४.९१ टक्के इतका आहे. धरणस्थळी आतापर्यंत केवळ २०५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी याच दिवशी धरणात ३४७.३२ मीटर पाणीपातळी, ७९.२८७ दशलक्ष घनमीटर म्हणजे ९१.८२ टक्के जलसाठा होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा जलसाठ्यात मोठी घट झाली आहे. महान धरणाची पाणीपातळी वाढण्यासाठी केवळ धरणस्थळी होणारा पाऊस पुरेसा नसून त्याच्या विस्तृत पाणलोट क्षेत्रातील पावसावर जलसाठ्याची मोठी भिस्त आहे. मात्र, यंदा मालेगाव, काटा-कोंडाळा, जऊळका रेल्वे, अमानवाडी, मुसळवाडी, धानोरा, फेट्रा आणि परिसरात अपेक्षित पाऊस झालेला नाही. परिणामी महान धरणाकडे येणारे पाण्याचे प्रवाहही अत्यल्प आहेत. महान धरण ते काटा-कोंडाळा दरम्यान असलेले लहान-मोठे तलाव व जलसाठेही अद्याप पूर्ण क्षमतेने भरलेले नाहीत. मालेगाव परिसरातून येणाऱ्या मुख्य काटा-कोंडाळा नदीपात्रालाही अद्याप अपेक्षित प्रवाह सुरू झालेला नाही. त्यामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. महान धरणाच्या जलसाठ्यावर कार्यकारी अभियंता चिन्मय वाकोडे व बोरगाव मंजूचे उपविभागीय अधिकारी आदित्य कासार यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा अभियंता संदीप नेमाडे, वैभव उगले व मनोज पाठक बारकाईने लक्ष ठेवून पाण्याचे नियोजन करीत आहेत. एका पावसाने वाढला होता ८ टक्के साठा गेल्या महिन्यात महानच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने धरणाच्या पाणीपातळीत सुमारे तीन फुटांची वाढ झाली होती. त्यावेळी जलसाठ्यात जवळपास ८ टक्क्यांनी वाढ होऊन तो २५ टक्क्यांपर्यंत पोहोचला. मात्र, त्यानंतर धरणाच्या पाणीपातळीत अपेक्षित दुसरी मोठी वाढ झालेली नाही. त्यामुळे उर्वरित पावसाळ्यात पाणलोट क्षेत्रात किती पाऊस होतो, यावरच धरणाच्या भवितव्याची गणिते अवलंबून आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *