![]()
नवसाला पावणाऱ्या श्रीक्षेत्र गवळीशिवरा येथील महारुद्र मारुती मंदिरात तिसऱ्या श्रावणी शनिवारी श्रद्धेचा महापूर आल्याचे पाहायला मिळाले. गेल्या काही दिवसांपासून पावसाने मारलेल्या दडीमुळे चिंतातूर झालेल्या शेतकरी राजासह तब्बल दोन लाखांहून अधिक भाविकांनी महारुद्राच्या चरणी हजेरी लावत ‘चांगला पाऊस पडू दे आणि शेती पिकू दे’, असे साकडे घातले. पहाटेपासूनच मंदिराच्या आवारात भक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सावंगी, माळीवाडगाव, वैरागड आणि फुलशिवरासह परिसरातील विविध गावांतून भाविकांच्या पायी दिंड्या हरिनामाच्या गजरात दाखल झाल्या. मागच्या शनिवारच्या तुलनेत या शनिवारी भाविकांची संख्या दुपटीने वाढल्याचे दिसून आले. नवस फेडण्यासाठी आलेल्या अनेक भक्तांनी आलेल्या भाविकांसाठी जागेवरच अन्नदान आणि महाप्रसादाची सोय केली होती. भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी मंदिर प्रशासनाने बॅरिकेड्स, दर्शन रांग, पिण्याचे पाणी आणि तात्पुरती निवासी व्यवस्था केली होती. सुरक्षेचा उपाय म्हणून संपूर्ण मंदिर परिसर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या पाळतीखाली ठेवण्यात आला आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि पार्किंग व्यवस्थेसाठी वसुसायगाव येथील बीएमजी अकॅडमीच्या स्वयंसेवकांनी मोलाचे योगदान दिले, तर शिल्लेगाव पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. रात्री उशिरापर्यंत भाविकांचा उत्साह आणि गर्दी कायम होती. भाविक-भक्तांसाठी १५ क्विंटल डाळबट्टीचा महाप्रसाद श्रावणी शनिवारच्या औचित्याने मंदिरात भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. मंगेश नवले, कृष्णा पिठले, वैजनाथ गोटे, नवनाथ बाराहाते आणि बजाजनगर येथील युवा उद्योजक राजू गोरे यांच्या वतीने १५ क्विंटल डाळबट्टी आणि साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद भाविकांना वाटण्यात आला.
Source link
गवळीशिवरा येथील महारुद्रमारुतीला पावसासाठी साकडे:तिसऱ्या शनिवारी दोन लाख भाविकांनी महारुद्र मारुतीचे घेतले दर्शन