Headlines

बिबट्याच्या दहशतीतून पळताना 11 वर्षीय कृष्णाचा तळ्यात पडून मृत्यू:जवळे कडलगमधील ‎हृदयद्रावक घटना‎




बिबट्याच्या भीतीने जीव वाचवताना शेततळ्यात पडून ११ वर्षीय कृष्णा वसंत पवार या मुलाचा शनिवारी (२९ ऑगस्ट) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुर्घटना संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग परिसरात घडली. या घटनेने परिसरावर शोककळा पसरली आहे. बिबट्यांच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्राथमिक माहितीनुसार, कृष्णा सायंकाळी घराजवळ असताना त्याला बिबट्या दिसला. घाबरून तो जीव वाचविण्यासाठी धावला. घरालगत असलेल्या शेततळ्यावरून जाताना त्याचा पाय घसरला आणि तो पाण्यात पडला. पाण्यात बुडाल्याने त्याचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, सुमारे सहा महिन्यांपूर्वी याच परिसरात सिद्धेश कडलग या चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्यामुळे पुन्हा एका बालकाचा बिबट्याशी संबंधित घटनेत मृत्यू झाल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व भीतीचे वातावरण आहे. ग्रामस्थांच्या माहितीनुसार, मागील सहा महिन्यांत नाशिक वन विभागाच्या रेस्क्यू पथकाने परिसरातून सुमारे १० बिबटे पकडले आहेत. १५ दिवसांपूर्वीही एका बिबट्याला पकडण्यात आले होते. मात्र, परिसरात अद्याप बिबट्यांचा वावर असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. रात्री शेतात जाणे शेतकरी व शेतमजुरांसाठी धोकादायक ठरत आहे. परिसराचे सर्वेक्षण, पिंजरे, कॅमेरा ट्रॅपद्वारे निगराणी आणि नियमित गस्त वाढवावी. बिबट्यांसोबतच शेततळ्यांच्या सुरक्षेचीही उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. शेतमजूर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कृष्णाचे वडील वसंत पवार हे गेल्या सुमारे १५ वर्षांपासून दत्ता कडलग यांच्या शेतावर शेतमजूर म्हणून काम करतात. कुटुंबासह ते याच परिसरात वास्तव्यास आहेत. कृष्णा हा त्यांचा एकुलता एक मुलगा असून, त्याला चार मोठ्या बहिणी आहेत. प्राथमिक शाळेत शिक्षण घेणाऱ्या कृष्णाच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *