Headlines

शेतकरी वाचवणे हाच सर्वांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असावा:विनायकदादा पाटील प्रतिष्ठानच्या शुभारंभप्रसंगी खा. सुळे यांचे प्रतिपादन‎




‘राजकारण होत राहील, मतभेदही होतील; मात्र शेतकऱ्यांना वाचवणे हाच सर्वांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असला पाहिजे,’ असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. विनायकदादा पाटील यांची नाळ काळ्या मातीशी जोडलेली होती. त्यामुळे कांदा उत्पादकांसह शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहून सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले. वनाधिपती विनायकदादा पाटील प्रतिष्ठानच्या शुभारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. निफाड तालुक्याच्या राजकीय, सामाजिक, सहकार, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्याचा ठसा उमटविणारे माजी मंत्री तथा वनाधिपती विनायकदादा पाटील यांच्या विचारांचा व कार्याचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली आहे. महागाई वाढत असताना सरकारकडे स्पष्ट धोरण असणे आवश्यक आहे. पायाभूत सुविधांसोबत शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले पाहिजे, असे सुळे म्हणाल्या. राजकीय मतभेद असले तरी समाजहित आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले. विनायकदादा केवळ राजकीय नेते नव्हते, तर ते त्यांचे काका होते. ते कोणत्याही एका पक्षाचे नव्हे, तर सर्वपक्षीय नेतृत्व होते. यशवंतराव चव्हाण यांच्या सुसंस्कृत राजकारणाचा संस्कार त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसून येत होता, असे सुळे यांनी सांगितले. मराठी भाषा व साहित्य संवर्धनासाठी प्रतिष्ठानने ठोस काम करावे. विनायकदादांची पुस्तके, लेखन, भाषणे व वैचारिक साहित्य डिजिटल स्वरूपात जतन करावे, असेही त्यांनी सुचवले. मोबाईल व रिल्सच्या वाढत्या प्रभावामुळे वाचन संस्कृती कमी होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. पत्रकारांनी राजकीय नेतृत्वावर टीका केलीच पाहिजे; मात्र मतभेद असले तरी संवादाची परंपरा कायम राहावी, असे त्या म्हणाल्या. यावेळी ज्येष्ठ नेते सुरेश पाटील, खासदार भास्कर भगरे, आमदार दिलीप बनकर, मविप्र सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, माजी आमदार संजय चव्हाण, सहकार नेते रमेशचंद्र घुगे, माजी आमदार नानासाहेब बोरस्ते आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. विनायकदादांनी आयुष्यभर जपलेला सुसंस्कृतपणा, सर्वसमावेशकता आणि माणसे जोडण्याची परंपरा नव्या पिढीने पुढे न्यावी, अशी अपेक्षा सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. विनायकदादांच्या कार्यासाठी आपण आणि आपला पक्ष सदैव उभा राहील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *