![]()
ईद-ए-मिलाद सण चांदवड शहरात उत्साहात विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यानिमित्त शहरातील विविध भागांत आकर्षक धार्मिक देखावे उभारण्यात आले होते. मुस्लीमबहुल मोहल्ले, घरे आणि दुकानांवर आकर्षक विद्युत रोषणाईसह सजावट करण्यात आली होती. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील जामा मस्जिद परिसरातून ईद-ए-मिलादुन्नबीच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणूक सोमवार पेठ, शिवनेरी चौक, नाईकवाडा, पुरा, मुल्लावाडा, शिवनेरी आदी प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत शाही जामा मस्जिद येथे पोहोचली. मिरवणुकीत मुस्लीम समाजबांधव सहभागी झाले होते. विविध ठिकाणी उभारलेले आकर्षक देखावे नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. मिरवणुकीची सांगता शाही जामा मस्जिद येथे झाली.त्यानंतर शहरातील सर्व समाजबांधव एकत्रित येत शाही मस्जिद येथे नियाज अर्थात महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. यात सर्व समाजांतील नागरिकांनी सहभागी होत सामाजिक सलोखा आणि एकतेचा संदेश दिला. पोलिस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. कार्यक्रमासाठी माजी नगरसेवक अल्ताफ तांबोळी, नगरसेवक राजू बागवान, चामको बँकेचे संचालक जाहिद घाशी, अल्ताफ शेख, तौसीफ खान उपस्थित होते.
Source link
चांदवडमध्ये ईद-ए-मिलाद मिरवणुकीत एकतेचा संदेश:शहरातील विविध भागांत आकर्षक धार्मिक देखावे