![]()
मुलीने कोणत्याही क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण करून यशाचे शिखर गाठायचे असेल, तर तिच्या पाठीशी वडिलांची भक्कम साथ असणे तितकेच महत्त्वाचे आहे. हा विश्वास असेल तर मुलगी आकाशालाही गवसणी घालू शकते, असा विश्वास लोकगायिका तथा आमदार मैथिली ठाकूर यांनी व्यक्त केला. तरुणींचे यश, महिला सुरक्षितता, राजकारण-गायनाचा समतोल आणि तरुणाईचा आध्यात्माकडे वाढता कल यावर ‘दिव्य मराठी’शी त्यांनी संवाद साधला. माझ्यासाठी संगीत केवळ एक कला नसून ती एक जीवनशैली आणि ‘मेडिटेशन’ आहे. लोकगीते माणसाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचा प्रवास उलगडतात. हे संस्कार आणि लोकगीते गाताना मला जीवनाबद्दल खूप काही समजून घेण्याचे भाग्य लाभले. संगीतानेच मला पूर्ण जीवन जगायला शिकवले आहे. त्यामुळेच मला ओळख मिळाली असून आता राजकारणातून लोकसेवा करण्याची संधी मिळाली आहे. संगीत साधनेने मला जीवन जगायला शिकवले Q : भक्तिसंगम सादरीकरणाबद्दल आणि नाशिकच्या सांस्कृतिक महत्त्वाबद्दल काय सांगाल? A : मी खूपच उत्साहित होते. मंचावर जाण्यासाठी मला १० मिनिटेही थांबणे कठीण झाले आहे. येथील मराठी रसिकांसाठी मी खास ‘अभंग’ तयार करून आणले होते. ते सादरीकरणानंतर रसिकांनी दिलेली दाद मला भावली. कुंभमेळ्याच्या आधी वातावरणनिर्मिती करण्यासाठी माझी या कार्यक्रमासाठी निवड झाली हा माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण आहे. विविध वयोगटातील प्रेक्षक पाहून भारावून गेले. काशीत ‘हर हर महादेव’चा गजर होतो, तसाच गजर येथेही होत आहे. Q : महिला, तरुण कलाकारांच्या सुरक्षिततेबद्दल काय सल्ला द्याल? A : आपण स्वतःसाठी एक चौकट तयार केली पाहिजे. तुम्ही मंचावर कोणते गीत गाता आणि लोकांशी कसे संवाद साधता, यावरूनच लोक तुमची प्रतिमा ठरवतात. तुम्ही स्वतः आत्मविश्वासाने वावरलात, तर तुम्ही १०० टक्के सुरक्षित आहात. आत्मविश्वास नसेल, तर लोक तुमच्या दुबळेपणाचा फायदा घेतात. Q : राजकारण अन् गायन या गोष्टींचे संतुलन कसे साधता A : सुरुवातीला हे खूप कठीण गेले. सकाळपासून मध्यरात्रीपर्यंत नागरिकांचा सातत्याने संपर्क येत होता. मात्र, हळूहळू मी माझ्या दिनचर्येत बदल केला. काम करत असतानाच अनेक गोष्टी शिकायला मिळतात. महिला नक्कीच उत्तम नेत्या ठरू शकतात, कारण त्यांच्यात अंगभूत सहनशीलता आणि संवेदनशीलता असते. महिला लोकप्रतिनिधी असल्याने अनेक ग्रामीण महिला मोकळेपणाने संवाद साधण्यासाठी पुढे येतात. Q : आजची ‘झेन जी’ तरुणाई अध्यात्माकडे वळत आहे, याकडे कशा पाहता? A : हा मी स्वतः अनुभवलेला एक मोठा बदल आहे. पूर्वी फक्त वृद्ध लोक भजनाला यायचे. आता पहिल्या रांगेत युवा वर्ग बसलेला असतो. आजकाल तरुणांमध्ये ‘भजन जॅम’ची क्रेझ आहे. तरुणांना कलेची जाण असणे ही सकारात्मक बाब आहे. सरकारने सनातन संस्कृतीच्या संवर्धनासाठी चांगले काम केले असून त्यासाठी भरीव तरतूदही केली आहे, वेळोवेळी होणारे मोठे कार्यक्रम आणि शासनाने सनातनसाठी उचललेली ही पावले, यामुळे तरुणाईसह एकूणच नागरिकांचा अध्यात्माकडे कल वेगाने वाढत असल्याचा सकारात्मक प्रभाव दिसत आहे.
Source link
गायिका मैथिली ठाकूर यांचा संवाद:म्हणाल्या- यशाचे शिखर गाठण्यासाठी मुलींना वडिलांची भक्कम साथ महत्त्वाची