![]()
तब्बल १४ वर्षांनी तीन दिवस रंगलेल्या ५२ व्या ज्युनिअर राज्यस्तरीय वॉटर पोलो चॅम्पियनशिप २०२६ मध्ये यजमान श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावतीच्या मुले व मुलींच्या संघाने आक्रमक सांघिक खेळासह दणदणीत यश मिळवून डंका मिरवला. दोन्ही गटांत जेतेपदासह सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. मंडळाच्या मुलांच्या तसेच मुलींच्या संघांनी उत्कृष्ट सांघिक खेळ, वेग, कौशल्याच्या बळावर प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करून दुहेरी अजिंक्यपद पटकावले. अंतिम सामन्यातील रोमहर्षक विजयामुळे जलतरण विभागात आणि उपस्थित प्रेक्षकांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते. महाराष्ट्र जलतरण संघटना, अमरावती जलतरण संघटना, श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ संचालित डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मंडळाच्या जलतरण विभागात या प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध भागांतील मुलांचे ९, मुलींचे ७ संघ सहभागी झाले होते. पुणे संघाने द्वितीय, रायगड संघाने तृतीय क्रमांक पटकावला. मुलांच्या आणि मुलींच्या दोन्ही संघांच्या विजयाने हा क्षण अमरावतीच्या क्रीडा इतिहासातील संस्मरणीय ठरला. अंतिम सामन्यादरम्यान मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण समारंभ पार पडला. महाराष्ट्र जलतरण संघटनेचे सचिव राजेंद्र पालकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, उपवनसंरक्षक, प्रादेशिक, अमरावती अर्जुना के. आर., टाइम्स ऑफ इंडियाचे ज्येष्ठ जिल्हा प्रतिनिधी अनिल जाधव, किशोर वैद्य, टॉमी जोशी, डॉ. लक्ष्मीकांत खंडागडे तसेच जलतरण विभागाचे प्रमुख डॉ. योगेश निर्मळ आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाच्या संघातील खेळाडूंना पदके व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. विजयी संघांचा आकर्षक करंडक देऊन गौरव करण्यात आला. विजयी जलतरणपटूंनी आपली विजयाची ट्रॉफी पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांना समर्पित करीत आपल्या यशाचे श्रेय त्यांना दिले. मंडळाचे कार्याध्यक्ष ॲड. प्रशांत देशपांडे, उपाध्यक्ष डॉ. श्रीकांत चेंडके, सचिव प्रा. डॉ. माधुरी चेंडके, कोषाध्यक्ष तथा डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशनचे प्राचार्य डॉ. श्रीनिवास देशपांडे, सचिव प्रा. विकास कोळेश्वर, सचिव प्रा. रवींद्र खांडेकर यांनी शुभेच्छा दिल्या. आयोजन समितीचे सचिव डॉ. लक्ष्मीकांत खंडागळे, जलतरण विभागाचे प्रमुख डॉ. योगेश निर्मळ तसेच जलतरण विभागातील सर्व कर्मचारी यांच्या अथक परिश्रमामुळे ही राज्यस्तरीय स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली. खऱ्या अर्थाने आनंद झाला : पद्मश्री प्रभाकरराव वैद्य अमरावती जिल्ह्यातील जलतरणपटूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जलतरण तलावाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा संकल्प, तो प्रत्यक्षात आणण्यासाठी केलेला दीर्घ संघर्ष आज या विजयामुळे सार्थकी लागल्याची भावना पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांनी व्यक्त केली. मंडळाच्या जलतरणपटूंनी यापूर्वीही अनेक राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटविला आहे. अनेक खेळाडूंनी शिवछत्रपती पुरस्कारासह विविध मान-सन्मान मिळवून मंडळाचा गौरव वाढविला आहे. या नव्या विजयी खेळाडूंनीही राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी झेप घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करीत पद्मश्री वैद्य यांनी सर्व जलतरणपटूंना आशीर्वाद दिला.
Source link
जलतरणात अमरावतीचे वर्चस्व; हव्याप्रच्या खेळाडूंचे सुवर्ण यश:52 व्या राज्यस्तरीय वॉटर पोलो चॅम्पियनशिपमध्ये अजिंक्यपद