Headlines

नेरपिंगळाई येथील गणेश चौकात गुंजला ‘बदलाव जरूरी हैं’चा नारा:महिला, युवक, विद्यार्थी व शेतकऱ्यांची लक्षणीय उपस्थिती‎




‘बदलाव जरूरी है…चलो दिल्ली!’ या घोषणांनी येथील गणेश चौक परिसर दुमदुमून गेला. १ सप्टेंबरच्या ‘चलो दिल्ली’ अभियानाच्या पार्श्वभूमीवर भारतीय कम्युनिस्ट पक्षाने आयोजित केलेल्या जनजागरण सभेमुळे असे झाले होते. सभेला महिला, युवक, विद्यार्थी, शेतकरी तसेच नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती. कार्यक्रमाला समविचारी राजकीय पक्ष आणि मित्रपक्षांच्या पदाधिकारी-कार्यकर्त् यांनीही हजेरी लावली होती. तरुणाईसमोरील बेरोजगारी, शिक्षणाच्या वाढत्या खर्चाचा प्रश्न आणि भविष्यातील रोजगाराच्या संधी याबाबत यावेळी नेत्यांनी आपल्या वकत्व्यातून जनजागृती केली. महिलांच्या सुरक्षिततेसह सामाजिक समानता आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवरही कार्यक्रमातून भाष्य करण्यात आले. यावेळी प्रा. डॉ. ओमप्रकाश कुटेमाटे यांनी शेती आणि शेतीच्या अर्थकारणाचा सविस्तर आढावा घेतला. वाढता उत्पादन खर्च, शेतीमालाच्या भावातील अनिश्चितता, बाजारपेठेतील अडचणी, कर्जबाजारीपणा आणि नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट होत असल्याचे त्यांनी मांडले. शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकरी कुटुंबांच्या समस्या आणि शेतीच्या अर्थकारणात शेतकरी कसा भरडला जात आहे, याचे वास्तव चित्र त्यांनी उपस्थितांसमोर मांडले. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉम्रेड सुनील मेटकर यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या जडणघडणीचा इतिहास तसेच देशातील सध्याच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थितीचा विस्तृत आढावा घेतला. शेतकरी, शेतमजूर, कामगार आणि कष्टकरी जनतेच्या प्रश्नांसाठी कम्युनिस्ट पक्षाने केलेल्या संघर्षाचीही त्यांनी माहिती दिली. कम्युनिस्ट पक्ष हा शेतकरी-शेतमजूर आणि कष्टकरी जनतेचा राजकीय पक्ष असून, सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी या चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. वर्तमान स्थितीत देशासमोर महागाई, बेरोजगारी, शेतीचे संकट, शिक्षण व आरोग्याशी संबंधित प्रश्न, महिला सुरक्षितता, जातीयवाद आणि भ्रष्टाचार यांसारखी आव्हाने असल्याचे सांगत, या प्रश्नांवर संघटितपणे आवाज उठवण्याची गरज असल्याचे वक्त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ‘बदलाव जरूरी है’ हा नारा जनतेच्या प्रश्नांशी जोडून व्यापक जनजागृती आणि संघटित संघर्ष उभारण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. या जनजागरण सभेला समविचारी राजकीय पक्ष आणि मित्रपक्षांनीही सहकार्य करून सहभाग नोंदवला, त्यामुळे कार्यक्रमाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले होते. खडसे यांच्या शाहीरीमुळे भारावून गेले नागरिक शाहीर धम्मा खडसे यांच्या क्रांतिकारी कलापथकाच्या माध्यमातून उपस्थित प्रेक्षक भारावून गेले होते. देशातील अराजकता, वाढती महागाई, बेरोजगारी, विद्यार्थी व तरुणांवरील अन्याय, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न, जातीयवाद आणि भ्रष्टाचार यांसारख्या प्रश्नांचा त्यांनी आपल्या प्रभावी गीतांमधून परखड समाचार घेतला. त्यांच्या गीतांमधून जनतेच्या प्रश्नांना आवाज देतानाच अन्यायाविरोधात संघर्ष करण्याचे आवाहन करण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *