Headlines

दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट:समृद्धी महामार्ग सुरक्षेची पडताळणी; 5 तासांच्या प्रवासात पोलिसांना 4 वेळा कॉल, तरी कुणी येईना




समृद्धी महामार्गावर दोन दिवसांपूर्वी दरोड्याची घटना घडली. दरोडेखोरांनी हैदोस घालत प्रवाशांना लुटले. अमानुष मारहाण केली. हा राज्यातील सर्वात मोठा महामार्ग, सरकारचा अत्यंत महत्त्वाकांक्षी ड्रीम प्रोजेक्ट… मात्र घडलेल्या दरोडेच्या घटनेनंतर दिव्य मराठी टीमने रविवारी (30 ऑगस्ट) प्रत्यक्ष महामार्गावर उतरत पडताळणी केली असता सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे दिसले. विशेष म्हणजे मदतीसाठी पोलिसांना 4 वेळा कॉल केले तरी कुणी मदतीसाठी आले नाही हे विशेष. ‘दिव्य मराठी’च्या टीमने सावंगी इंटरचेंज ते वैजापूर इंटरचेंजदरम्यान सायंकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत 5 तास ‘लेट-नाइट’ रिॲलिटी चेक केला. यावेळी समृद्धीच्या सुरक्षेचा बोजवारा उडाल्याचे दिसले. लासूर परिसरातील हडस पिंपळगाव इंटरचेंजपासून अवघ्या 7 ते 8 किमी अंतरावर जेथे मिश्रा कुटुंबीयांना दरोडेखोरांनी लूट केली होती, तेथे ‘दिव्य मराठी’च्या टीमने 25 मिनिटे गाडी थांबवून मदतीचा थरार अनुभवला. दरोड्याच्या दहशतीमुळे एकाही चालकाने गाडीचा वेग कमी केला नाही. पुढे जाऊन लासूर टोल नाक्यावर जेव्हा आम्ही “गाडी पंक्चर झाली आहे, मदत करा” असे सांगितले, तेव्हा नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी “आम्ही काही करू शकत नाही, कंट्रोल रूमला फोन करा’ असे उडवाउडवीचे उत्तर देऊन हात वर केले. नंतर एका खासगी पंक्चरवाल्याचा नंबर मिळाला, तर त्याने रात्रीच्या वेळी एका पंक्चरसाठी थेट 2,000 रुपये लागतील, असे सांगितले. तेव्हा समृद्धीवर एकीकडे दरोडेखोरांची तर दुसरीकडे अव्वाच्या सव्वा पैसे उकळणारे फिरत असल्याचे यातून दिसून आले. कुटुंबासह प्रवास करायला आता खरंच भीती वाटते आम्ही टोल नाक्यावर पूर्ण टोल भरतो, पण महामार्गावर सुरक्षा मात्र शून्य आहे. पथदिवे बंद आहेत, सीसीटीव्ही बंद आहेत. अशा परिस्थितीत रात्रीच्या वेळी कुटुंबाला सोबत घेऊन समृद्धी महामार्गावरून प्रवास करायला आता खरंच भीती वाटते. सरकारने यावर तातडीने उपाययोजना कराव्यात. जेणेकरून हा महामार्ग सर्वसामान्य वाहनधारकांसाठी सुरक्षित ठरेल. -राम चिल्लाळे, प्रवासी (पुणे) समृद्धी महामार्गावर वाहतुकीत बदल आधुनिक वाहतूक नियंत्रण यंत्रणा बसवण्यासाठी लोखंडी कमानी उभारण्याचे काम सुरू आहे. यामुळे 31 ऑगस्ट, 1 आणि 2 सप्टेंबरला ‘सिन्नर ते भरवीर’, तर 4, 5 आणि 7 सप्टेंबरला ‘भरवीर ते इगतपुरी’ दरम्यान दुपारी 12 ते 1 (मुंबईकडे) व दुपारी 3 ते 4 (नागपूरकडे) वाहतूक पूर्णपणे बंद राहील, असे पत्रक महामार्ग प्रशासनाने काढले आहे. वाहनात कोण आहे याची साधी तपासणी होत नाही नेमक्या काय त्रुटी? या उपाययोजना गरजेच्या निर्मनुष्य भागात 24 तास गस्त: टाकळीची वाडी ते लासूर स्टेशन या संवेदनशील पट्ट्यात महामार्ग पोलिसांची 24 तास अखंड पेट्रोलिंग सुरू व्हावी.
आयटीएस यंत्रणा तात्काळ लागू करा: 1,698 कोटींच्या प्रकल्पांतर्गत 4,800 आयपी कॅमेरे आणि 16 ड्रोनची सुरक्षा सिस्टिम कागदावरून काढून तातडीने रस्त्यावर सक्रिय करावी.
तुटलेल्या जाळ्या व भिंतींची दुरुस्ती: तुटलेल्या संरक्षक भिंती, गायब झालेल्या सुरक्षा जाळ्या दुरुस्त करून चोरीला गेलेल्या सौर बॅटऱ्या त्वरित नवीन बसवाव्यात.
टोल नाक्यावर मोफत मदत कक्ष: गाडी बंद पडल्यास किंवा पंक्चर झाल्यास टोल प्रशासनाकडून रास्त दरात आणि तत्काळ मदत पुरवणारी अधिकृत आपत्कालीन यंत्रणा उभी राहावी. ही महाकाय सुरक्षा व्यवस्था कागदावरच
701 किमीचा हा समृद्धी महामार्ग सुरक्षित ठेवण्यासाठी कागदावर भलीमोठी यंत्रणा दाखवली जाते. पण रात्री रस्त्यावर उतरल्यावर ही सगळी यंत्रणा नेमकी कुठे गायब होते, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 1 701 किमी महामार्ग
पसरलेला रस्ता, पण निर्मनुष्य पट्ट्यात प्रवाशांच्या मदतीसाठी एकही सुरक्षा वाहन दिसत नाही.
2 192 एमएसएफ जवान, 2 अधिकारी
महामार्गाच्या सुरक्षेचा दावा करणारे जवान प्रत्यक्ष पाहणीत कुठल्याही पॉइंटवर आढळले नाहीत.
3 4,206 पोलिस व 18 पोलिस ठाणी
कागदावर संपूर्ण महामार्ग पोलिसांशी कनेक्टेड, पण 5 तासांच्या पाहणीत गस्त शून्य.
4 325 क्यूआरव्ही 2 तास पोहोचत नाही
तातडीच्या मदतीसाठी असलेल्या या गाड्या फोन केला तरी 2 तास घटनास्थळी पोहोचतच नाहीत. 5 16 टोल नाक्यांवर आरटीओ वाहने
नाक्यांवर आरटीओचे कर्मचारी असतात, पण ते सुरक्षेची पाहणी करण्याऐवजी टेम्पो ट्रॅव्हलर्सचीच तपासणी करताना दिसतात. आम्ही गस्त वाढवली आहे समृद्धीवरील घटनेनंतर आम्ही गस्त वाढवली आहे. बनावट नंबर प्लेट असलेल्या संशयित वाहनांवर कारवाईच्या सूचना एमएसआरडीसीला दिल्या आहेत. दोन इंटरचेंजमधील अंतर जास्त असल्याने घटनास्थळी पोहोचण्यास पोलिसांना काहीसा वेळ लागतो. त्यामुळे प्रवाशांनी सतर्क राहावे.
​- रूपाली दरेकर, पोलिस अधीक्षक (महामार्ग) 20 वेळा मदतीसाठी धावून गेलो या पाहणीदरम्यान गावकऱ्याची भेट झाली. “महामार्गावर डिझेल चोरी झाली किंवा वाहनाचे टायर पंक्चर झाले, की हवालदिल झालेले चालक रात्री माझ्या घरी धाव घेतात. मी त्यांना मदत करतो. क्यूआरव्ही, एमएसएफ आणि टोल नाक्यावर फोन केला तरी 2-2 तास मदत येत नाही. टाकळीची वाडी ते लासूर स्टेशन हा भाग निर्मनुष्य असल्याने 15 दिवसांतून एकदा चोऱ्या होतात. मी आतापर्यंत 20 वेळा स्वतः घटनास्थळी जाऊन लोकांची मदत केली आहे. महामार्गावर घडणारे भीषण प्रसंग मी उघड्या डोळ्यांनी पाहिले आहेत. – देवधन किशन गुसिंगे, स्थानिक नागरिक, टाकळीची वाडी हडस पिंपळगाव, सिन्नर फाट्यावरील दरोड्याच्या घटनेनंतरही जैसे थे
पडताळणी : दिव्य मराठीच्या टीमने दरोडा पडलेल्या ठिकाणी वाहन पंक्चर झाल्याचे भासवून समृद्धी महामार्ग प्रकल्प, पोलिस, आरटीओ यांची मदत मिळवण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी कुणीच मदतीसाठी आले नाही. रात्रीचे 9 वाजले होते. टाकळीची वाडी ते लासूर स्टेशन हा संपूर्ण पट्टा सामसूम आणि निर्मनुष्य. आम्ही रस्त्याच्या कडेला गाडी थांबवली. सभोवताली किर्र अंधार आणि बाजूने कानठळ्या बसवणाऱ्या वेगाने जाणारी वाहने. वाहन बिघडल्याचा बनाव करत आम्ही येणाऱ्या गाड्यांना मदतीसाठी हात दाखवत होतो. अनेक वाहनधारकांना हात जोडून विनवण्या केल्या, पण प्रत्येक चालकाने अपघाताच्या किंवा दरोडेखोरांच्या भीतीने गाडीचा वेग आणखी वाढवून पुढे पळ काढला. टोल नाक्यावर पोहोचल्यावर वाहनांची साधी सुरक्षा तपासणीही होत नव्हती आणि कर्मचारी मदत करण्याऐवजी खासगी पंक्चर चालकांची दुकाने चालवण्यात मग्न असल्याचे स्पष्ट दिसले. अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद नाही याबाबत अधिकृत प्रतिक्रिया घेण्यासाठी समृद्धी महामार्गाचे एमडी अनिलकुमार गायकवाड, प्रकल्प संचालक एस. श्रावगे, रामदास खलसे यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *