Headlines

मराठा आरक्षणावर सरकार सकारात्मक:ओबीसींना धक्का न लावता मार्ग काढणार, मंत्री उदय सामंतांची महत्त्वाची माहिती




मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत उपोषण सुरू केले असून आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. सरकारच्या वतीने कोणते शिष्टमंडळ त्यांची भेट घेणार आणि ही भेट कधी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर, मंत्री उदय सामंत आणि प्रसाद लाड यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत सामंत यांनी या भेटीबाबत महत्त्वपूर्ण माहिती देत मोठा खुलासा केला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना उदय सामंत म्हणाले, ओबीसी समाजाचे काही नुकसान न करता, त्यांच्यावर कुठलाही अन्याय न करता आपल्याला मराठा समाजाच्या मागण्या मान्य करायच्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमची धोरणात्मक चर्चा सुरू आहे, अशी माहिती सामंत यांनी दिली आहे. तसेच परभणीच्या मेळाव्यावर जरांगे यांनी टीका केली होती. त्यावर बोलताना सामंत म्हणाले, कोणतरी गैरसमज केला म्हणून त्यांच्या तोंडातून काही शब्द आले असतील. त्यांनी संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीबाबत असे बोलू नये, अशी विनंती देखील आम्ही त्यांना केली असल्याचे सामंत यांनी सांगितले. आम्ही सकारात्मक पद्धतीने पुढे जात आहोत पुढे बोलताना उदय सामंत म्हणाले, मुद्दा असा आहे की काल एकनाथ शिंदे यांनी देखील आपल्या भाषणात सांगितले, आणि देवेंद्र फडणवीस यांनी देखील सांगितले की मराठा समाजाचे प्रश्न सोडवणारा तळमळीचा माणूस हा मनोज जरांगे आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल कोणाच्या मनात आकस असण्याचा प्रश्नच येत नाही. परंतु तिथे कधी जायचे कसे जायचे हे आम्ही ठरवू, मुद्दा असा आहे की शासन मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांसदर्भात सकारात्मक पाऊल टाकत आहे. धोरणात्मक पद्धतीने निर्णय कसा घ्यायचा? यावर आज देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली आहे. या सर्व गोष्टींमध्ये आम्ही सकारात्मक पद्धतीने पुढे जात आहोत, आम्ही कसे जाणार, काय जाणार हे आम्ही काही कालावधीमध्ये सांगू. मनोज जरांगे पाटील यांची खालावत चाललेली तब्येत, सरकारच्या शिष्टमंडळाची भेट आणि त्यांच्या मागण्या कधी पूर्ण होणार, याबाबत उदय सामंत यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आले होते. यावर त्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. आम्हाला देखील काळजी आहे यावर बोलताना उदय सामंत यांनी म्हटलं की, मी काल देखील पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, किंवा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार असतील. त्यांनी जेव्हा आमच्याशी चर्चा केली, तेव्हा त्यांनी सांगितले की आंदोलन करणे हा लोकशाहीचा एक भाग आहे. परंतु मनोज जरांगे पाटील यांना स्वत:च्या तब्येतीची देखील काळजी घ्यायला सांगा, आणि तो निरोप आम्ही त्यांना दिला आहे. कारण आम्हाला देखील त्यांची काळजी आहे. त्यामुळे त्यांच्या मागण्या कशा मान्य करायच्या? कोणत्या पद्धतीने मान्य करायच्या? यावर चर्चा सुरू आहे, ते ठरण्यानंतर आम्ही तुम्हाला सांगू, असे सामंत यांनी म्हटले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *