Headlines

छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावर पुन्हा थरार!:कड्यावर गेलेल्या व्यक्तीमुळे उडाली खळबळ, नागरिकांच्या सतर्कतेने टळला अनर्थ




छत्रपती संभाजीनगरमधील तीसगाव परिसरातील खवड्या डोंगरावर आज सायंकाळी 4 वाजता पुन्हा एक व्यक्ती धोकादायक ठिकाणी गेल्याचा प्रकार समोर आला आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वीच याच डोंगरावर एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली होती. या ताज्या घटनेमुळे परिसरात पुन्हा एकदा खळबळ उडाली असली तरी, वेळेवर मिळालेल्या हस्तक्षेपामुळे संभाव्य दुर्घटना टळली. ही व्यक्ती खवड्या डोंगराच्या कड्यावर उभी असल्याचे खाली असलेल्या नागरिकांच्या लक्षात आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नागरिकांनी तातडीने खालून आरडाओरडा करत त्या व्यक्तीला धोकादायक भागापासून दूर जाण्याची विनंती केली. प्रशासनाने यापूर्वीच येथे जाण्यास मनाई केली असतानाही लोक जीव धोक्यात घालत असल्याने नेटकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कडक उपाययोजनांची मागणी केली जात आहे. 21 ऑगस्ट रोजी घडली होती दुर्घटना 21 ऑगस्ट रोजी खवड्या डोंगरावर 18 वर्षीय कुणाल चांदगुडे याने वडिलांसोबतच्या वादातून रागाच्या भरात आत्महत्या करण्याच्या हेतूने तो सकाळी 10 वाजता खवड्या डोंगरावर पोहोचला. ही माहिती मिळताच कुणालचे वडील मुरलीधर आणि आई संगीता चांदगुडे हे त्याला समजावण्यासाठी डोंगरावर गेले. तीन तासांचे बचावकार्य ठरले निष्फळ मुलाला आत्महत्येपासून रोखण्यासाठी आई-वडील, स्थानिक नागरिक, अग्निशमन दल आणि पोलिसांनी सुमारे तीन तास शर्थीचे प्रयत्न केले. कुणालला सुरक्षित खाली आणण्यासाठी प्रशासनाने डोंगराच्या खाली जाळी लावण्याचाही प्रयत्न केला. मात्र, कुणाल कोणाचेही न ऐकता वारंवार आपली जागा बदलत राहिल्याने बचावकार्यात मोठे अडथळे निर्माण झाले. एका क्षणात संपले संपूर्ण कुटुंब अखेर सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आणि कुणालने डोंगरावरून खाली उडी घेतली. डोळ्यांदेखत मुलाने उडी मारल्याने त्याला वाचवण्याच्या झटापटीत वडील मुरलीधर यांचाही तोल गेला आणि ते खाली कोसळले. पती आणि मुलगा डोळ्यांसमोर खाली पडल्याचे पाहून आई संगीता यांचाही दुर्दैवी अंत झाला. तिघांचेही मृतदेह बचाव पथकाने बाहेर काढले असून, या घटनेमुळे शहरात आजही मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *