Headlines

नागपूरचा 'हिलटॉपचा राजा' देणार 'घर घर डॉक्टर' संदेश:151 फुटांच्या सत्यसाई हॉस्पिटलच्या रूपात साकारणार देखावा




नागपूर शहरातील सर्वात उंच गणेशमूर्तीचा मान मिळवणारा आणि 40 वर्षांपासून सेवा देणारा ‘एकता गणेश उत्सव मंडळाचा’ सुप्रसिद्ध ‘हिलटॉपचा राजा’ यंदा एका अनोख्या सामाजिक संदेशासह भक्तांसमोर येणार आहे. मंडळाने या वर्षी “घर घर डॉक्टर, हर घर डॉक्टर” ही संकल्पना हाती घेतली आहे. या अंतर्गत, बाप्पाची मूर्ती डॉक्टरच्या रूपात मध्य नागपुरातील ऐतिहासिक चितार ओळीत साकारण्यात येत आहे. येत्या 14 सप्टेंबर 2026 रोजी ‘हिलटॉपच्या राजा’चे शहरात आगमन होणार असून, आरोग्य संदेश देणारा हा बाप्पा यंदा देशात विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. यंदाच्या गणेशोत्सवाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे बंगळुरू (कर्नाटक) येथील मोफत वैद्यकीय सेवेसाठी प्रसिद्ध असलेल्या सत्यसाई बाबा हॉस्पिटलच्या रूपात तब्बल 151 फुटांचा भव्य देखावा व मंदिर साकारले जात आहे. या भव्य रुग्णालयाच्या प्रतिकृतीमध्ये डॉक्टरच्या रूपातील श्रीगणेश विराजमान होणार आहेत. या सोहळ्याचे आणखी एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे मुंबईतील लालबाग भागातून विशेषरित्या मागवण्यात आलेल्या सात अत्यंत आकर्षक गणेशमूर्ती थेट नागपुरात येणार आहेत. या मूर्ती 151 फुटांच्या सत्यसाईबाबा हॉस्पिटलमध्ये ‘हिलटॉपच्या राजा’सोबत एकाच मंचावर स्थानापन्न होतील. नागपूरकरांसाठी आणि गणेशभक्तांसाठी हा क्षण अत्यंत आनंदाचा आणि अपूर्व सोहळा ठरणार आहे. या उपक्रमातून “प्रत्येक कुटुंबात किमान एक तरी डॉक्टर असायला आणि शिकायला पाहिजे, जेणेकरून ते कुटुंब कायम निरोगी, स्वस्थ आणि सुदृढ राहील” हा सामाजिक संदेश दिला जात आहे. माजी आमदार प्रकाश गजभिये यांनी सर्व गणेशभक्तांना व कार्यकर्त्यांना या सोहळ्यात सहभागी होऊन बाप्पाचा आशीर्वाद घेण्याचे आणि आपल्या कुटुंबातील किमान एका विद्यार्थ्याला डॉक्टर बनवून देशसेवेत योगदान देण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी या स्तुत्य सामाजिक उपक्रमाला सर्वांनी सहकार्य करावे अशी विनंतीही केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *