![]()
पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता पदासाठी घेण्यात आलेल्या भरती परीक्षेत हायटेक पद्धतीने गैरप्रकार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील चिखलठाणा येथील परीक्षा केंद्रावर तीन उमेदवारांनी चष्म्यामध्ये बसवलेल्या छुप्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून संगणकाच्या स्क्रीनवरील प्रश्नांची छायाचित्रे घेतल्याचा संशय आहे. त्यानंतर ही माहिती परीक्षा केंद्राबाहेर पाठवून त्याच्या आधारे प्रश्न सोडवण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. पुणे महापालिकेने 169 कनिष्ठ अभियंता पदांसाठी 2024 मध्ये भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली होती. विविध कारणांमुळे परीक्षा अनेक वेळा पुढे ढकलण्यात आली. अखेर एप्रिल 2026 मध्ये विविध शहरांतील परीक्षा केंद्रांवर ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. पुणे, मुंबई, नागपूर, अमरावती, कोल्हापूर, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर या शहरांमध्ये हजारो उमेदवारांनी परीक्षा दिली. परीक्षेनंतर प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर आणि टेलिग्रामवर प्रसारित झाल्याची माहिती महापालिकेला मिळाली. त्यानंतर परीक्षा प्रक्रियेची जबाबदारी असलेल्या IBPS आणि TCS यांच्याकडे याबाबत तांत्रिक तपासणी करण्याची मागणी करण्यात आली. तपासादरम्यान चिखलठाणा केंद्रातील तीन उमेदवारांच्या हालचाली संशयास्पद असल्याचे आढळून आले. लॉगशीट आणि CCTV तपासातून गैरप्रकार उघड महापालिका आणि परीक्षा यंत्रणेकडून संबंधित उमेदवारांच्या डिजिटल हालचाली, परीक्षा लॉग आणि CCTV फुटेजची तपासणी करण्यात आली. या तपासात तीन उमेदवारांचा परीक्षा देण्याचा पॅटर्न संशयास्पद असल्याचे दिसून आले. परीक्षा सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात या उमेदवारांनी प्रश्न सोडवण्याऐवजी बराच वेळ घेतला. त्यानंतर तिघेही वॉशरूममध्ये गेल्याचे CCTV फुटेजमध्ये दिसून आले. वॉशरूममधून परत आल्यानंतर त्यांच्या प्रश्न सोडवण्याच्या वेगात अचानक बदल झाल्याचे डिजिटल लॉगमधून आढळले. विशेष म्हणजे, परीक्षेच्या शेवटच्या टप्प्यात त्यांनी मोठ्या संख्येने प्रश्न सोडवले आणि 90 पेक्षा अधिक गुण मिळवल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे या तिघांबाबतचा संशय अधिक बळावला. तांत्रिक तपासादरम्यान प्रश्नपत्रिकेची छायाचित्रे काढण्यासाठी चष्म्यामध्ये सूक्ष्म कॅमेरा बसवण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. कॅमेऱ्याच्या मदतीने संगणकाच्या स्क्रीनवरील प्रश्न बाहेर पाठवले जात होते आणि त्यानंतर बाहेरून उत्तरे मिळवून ती परीक्षा देताना वापरली जात असल्याची प्राथमिक माहिती तपासातून समोर आली आहे. महापालिकेने मोठ्या संख्येने उमेदवारांच्या डिजिटल हालचालींचे विश्लेषण केल्यानंतर संबंधित तीन उमेदवारांवर विशेष लक्ष केंद्रित केले. या तपासामुळे साध्या नजरेला सहज लक्षात न येणाऱ्या ‘कॅमेरा चष्म्या’चा वापर करून केलेल्या कॉपीचा प्रकार उघडकीस आल्याचे सांगण्यात येत आहे. तीन उमेदवारांसह कर्मचाऱ्यांवरही कारवाई या प्रकरणात गजानन पाचे, शिवशंकर शेळगावे आणि विष्णू कांत वाघमारे या तीन उमेदवारांची नावे समोर आली आहेत. या तिघांनी परीक्षेत गैरप्रकार केल्याचा आरोप असून, त्यांना बाहेरून मदत करण्यात आल्याचाही तपास यंत्रणेला संशय आहे. परीक्षा केंद्राशी संबंधित असलेल्या व्यक्तींचीही चौकशी करण्यात आली. TCS शी संबंधित योगेश राठोड आणि विकास गायकवाड यांनी या उमेदवारांना गैरप्रकारात मदत केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी तीन उमेदवारांसह संबंधित कर्मचाऱ्यांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासात आणखी एका व्यक्तीचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, पोलिसांकडून त्याचाही शोध घेतला जात आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर, लातूर, हिंगोली आणि जालना या भागांत स्वतंत्र पथके तयार केली आहेत. परीक्षा केंद्रावर मोबाईल कसा पोहोचला, चष्म्यातील कॅमेऱ्याचा वापर नेमका कसा करण्यात आला, प्रश्नपत्रिकेची माहिती कोणाला पाठवण्यात आली आणि त्याबदल्यात कोणाकडून उत्तरे मिळाली, या सर्व बाबींचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे. दरम्यान, संबंधित तीन उमेदवारांना परीक्षेत 90 पेक्षा अधिक गुण मिळाले असून त्यांची कनिष्ठ अभियंता पदासाठी निवड झाल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्यांच्या निकालाची आणि निवड प्रक्रियेचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. परीक्षा रद्द करण्याची मागणी; गैरप्रकाराचा आवाका किती? गैरप्रकाराचा प्रकार समोर आल्यानंतर पुणे महापालिकेने संपूर्ण परीक्षा रद्द करावी, अशी मागणी काही उमेदवार आणि अभियंत्यांकडून करण्यात येत आहे. मात्र, प्राथमिक तपासात केवळ तीन उमेदवारांचा गैरप्रकार समोर आला असल्याने संपूर्ण परीक्षा रद्द करण्याबाबत महापालिकेने अद्याप निर्णय घेतलेला नाही. दुसरीकडे, हा गैरप्रकार केवळ तीन उमेदवारांपुरता मर्यादित नसून त्यामागे आणखी काही व्यक्ती किंवा मोठे नेटवर्क असण्याची शक्यता असल्याचा दावा काही परीक्षार्थींनी केला आहे. त्यामुळे महापालिकेच्या या भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी सांगितले की, संबंधित परीक्षा केंद्रावरील उमेदवारांच्या डिजिटल हालचालींचे विश्लेषण करण्यात आले. त्यामध्ये तीन उमेदवार वॉशरूममध्ये गेल्यानंतर पुन्हा परीक्षा हॉलमध्ये आल्याचे आढळले. वॉशरूममध्ये मोबाईल मिळाल्याची माहितीही तपासात समोर आली आहे. डोळ्यांच्या पातळीवर कॅमेरा असलेल्या चष्म्याच्या माध्यमातून प्रश्नपत्रिकेचे फोटो घेण्यात आले असावेत, असा संशय आहे. आता या प्रकरणाचा तपास शिवाजीनगर पोलिसांकडून सुरू असून, या हायटेक कॉपीमागे नेमके किती जण सहभागी आहेत, प्रश्नपत्रिकेची माहिती कुठे आणि कोणाकडे पाठवण्यात आली, तसेच या गैरप्रकाराचा इतर उमेदवारांनाही फायदा झाला का, याची उत्तरे तपासानंतरच स्पष्ट होणार आहेत. हेही वाचा.. MPSC पेपरफुटीत गौरवनंतर ऋतुजा पाटीललाही अटक:’प्रेमाचा अँगल’ असल्याचे सांगून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न, दुसऱ्या तक्रारदाराचा गंभीर आरोप राज्यातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटी प्रकरणात ‘प्रेमाचा अँगल’ असल्याचे सांगून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप पुढे आला आहे. या प्रकरणाची तक्रार करणाऱ्या ऋषिकेश गांगुर्डे याने हा दावा केला असून, मूळ पेपरफुटीच्या मोठ्या रॅकेटला वेगळे वळण देण्याचा हा प्रकार असल्याचे म्हटले आहे.सविस्तर वाचा..
Source link
पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता परीक्षेत गैरप्रकार:चष्म्यात कॅमेरा, प्रश्नपत्रिकेचे फोटो अन् बाहेरून उत्तरे