Headlines

अजित पवारांच्या तैलचित्राने भाजप-राष्ट्रवादीतील वाद मिटवण्याचा प्रयत्न:पुणे महापालिकेत स्थानिक नेत्यांची बैठक; गणेश बिडकर म्हणाले, 'आम्ही एकच'




पुणे महापालिकेत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय दुरावा कमी झाल्याचे चित्र मंगळवारी दिसले. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या तैलचित्राच्या निमित्ताने दोन्ही पक्षांमध्ये दिलजमाई झाली. गेल्या काही दिवसांपासून महायुतीतील या दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांमध्ये वाद सुरू होता. आता तो मिटवण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे संकेत या बैठकीतून मिळाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निधीतून झालेल्या विकासकामांची चौकशी करण्याची मागणी केली होती. यानंतर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महापालिकेच्या पातळीवर मतभेद वाढले होते. या प्रस्तावाला अनुमोदन देणारे राष्ट्रवादीचे नगरसेवक सुहास टिंगरे यांच्या प्रभागस्तरीय निधीलाही भाजपने कात्री लावल्याची चर्चा होती. त्यामुळे महायुतीतील या दोन पक्षांमधील संघर्ष वाढला होता. हा विषय दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंतही पोहोचला होता. या वादामुळे पुणे महापालिकेच्या मुख्य भवनात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे तैलचित्र लावण्याचा निर्णय घेण्यात आला. या संदर्भात मंगळवारी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची बैठक झाली. बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे, आमदार चेतन तुपे, महापालिकेतील विरोधी पक्षनेते निलेश निकम, महापौर मंजुषा नागपुरे आणि सभागृह नेते गणेश बिडकर उपस्थित होते. अजित पवार यांचे हे तैलचित्र सभागृह नेते गणेश बिडकर यांनी तयार करून घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे तैलचित्राच्या निमित्ताने दोन्ही पक्षांमधील संबंध पुन्हा चांगले करण्याचा प्रयत्न होत असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. या घडामोडींवर गणेश बिडकर यांनी भाजप आणि राष्ट्रवादीतील मतभेदांच्या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, “पुणे शहराची राजकीय संस्कृती जपण्याचे काम आम्ही करत आहोत. आमच्यात कोणताही वाद नाही. आम्ही एकच आहोत.” अजित पवार यांच्या तैलचित्राच्या निमित्ताने भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी एकत्र येत हा संदेश दिला. आगामी काळातील पुणे महापालिकेतील राजकीय समीकरणांसाठी हा महत्त्वाचा मानला जात आहे. नुकत्याच झालेल्या वादानंतर दोन्ही पक्षांतील संबंध पुन्हा पूर्ववत होतील की हा केवळ तात्पुरता सामंजस्याचा प्रयत्न आहे, याबाबत आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *