Headlines

सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे डीजेबाबत स्पष्ट भूमिकेची मागणी:फुरसुंगी कचरा डेपो, वाढती गुन्हेगारी, पेपरफुटीवरून सरकारवर टीका; आयुक्तांशी चर्चा




राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे महापालिका आयुक्तांची भेट घेतली. यावेळी त्यांनी डीजे आणि ध्वनिप्रदूषणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट निर्णय जाहीर करावा, अशी मागणी केली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी आवश्यक असून, मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला योग्य दिशा द्यावी, असेही त्या म्हणाल्या. सुळे यांनी फुरसुंगी येथील कचरा डेपोविरोधात सुरू असलेल्या आंदोलनासह शहरातील अनेक प्रश्नांवर आयुक्तांशी चर्चा केली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्य सरकारच्या कामावर टीका केली. फुरसुंगी कचरा डेपोबाबत नागरिक अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी आयुक्तांनी १५ दिवसांचा वेळ मागितल्याचे सुळे यांनी सांगितले. कचरा डेपोचे काम योग्य आणि नियोजनबद्ध पद्धतीने झाले पाहिजे, नागरिकांचे प्रश्न सोडवणे हेच प्राधान्य आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. शहरात वाढलेल्या गुन्हेगारीबद्दलही सुळे यांनी चिंता व्यक्त केली. ‘आंदोलक आणि शेतकऱ्यांवर लगेच गुन्हे दाखल होतात; पण लोकांना फसवणारे आणि गंभीर गुन्हे करणारे आरोपी का सापडत नाहीत? कोयता गँगवर योग्य कारवाई का होत नाही?’ असे प्रश्न त्यांनी विचारले. पेपरफुटीच्या घटनांवरूनही सुळे यांनी सरकारला लक्ष्य केले. जगभरात परीक्षा व्यवस्थित होत असताना, आपल्या जिल्ह्या-तालुक्यांतच वारंवार पेपर फुटत आहेत. याला जबाबदार कोण, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राज्यात मराठा, ओबीसी, आदिवासी, शेतकरी आणि विद्यार्थी वेगवेगळ्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरत आहेत. सुमारे दोनशे आमदारांचे सरकार असतानाही जनतेला आंदोलन करावे लागत असेल, तर सरकारच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण होते, अशी टीका सुळे यांनी केली. प्रशासनाने ‘एसआयआर’ प्रक्रिया पारदर्शकपणे राबवावी, असेही त्या म्हणाल्या. फलटण येथील आत्महत्येच्या प्रकरणाची आपण स्वतः माहिती घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *