![]()
जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील शिवरे येथे ग्रामसभेत ग्रामपंचायत अधिकाऱ्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद आता छत्रपती संभाजीनगरमध्ये उमटले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियनने मंगळवारी (१ सप्टेंबर) जिल्हा परिषदेपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढला. अधिकाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न यामुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी १८ ऑगस्टपासून ग्रामसभा कामकाजावर टाकलेला बहिष्कार कायम ठेवला आहे. १७ ऑगस्ट रोजी शिवरे येथे ग्रामसभा सुरू असताना जमावाने ग्रामपंचायत अधिकारी पी. एन. पाटील यांच्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यामुळे त्यांना मानसिक आणि शारीरिक त्रास झाला. कर्तव्यावर असतानाच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे राज्यातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांमध्ये संताप आहे. २३ ऑगस्ट रोजी झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत राज्यभर आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार, जिल्हाध्यक्ष भिमराज दाणे पाटील आणि जिल्हा सरचिटणीस प्रविण नलावडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. ग्रामसेवक संघटनेच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत: पी. एन. पाटील यांच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करून खटला जलदगती न्यायालयात चालवावा. वारंवार होणाऱ्या १० ते १२ ग्रामसभांऐवजी वर्षातून केवळ एकच आर्थिक नियोजन व आढावा ग्रामसभा ठेवण्यासाठी नियमात बदल करावा. ग्रामसभेत त्रयस्थ व्यक्तींकडून सोशल मीडियासाठी केल्या जाणाऱ्या अनधिकृत व्हिडिओ चित्रीकरणावर कायदेशीर बंदी घालावी. संवेदनशील आणि वादग्रस्त ग्रामपंचायत बैठकांसाठी प्रशासनाने सक्तीने व विनामूल्य पोलीस बंदोबस्त द्यावा. वैयक्तिक लाभाच्या योजनांचे लाभार्थी ग्रामसभेत निवडण्याऐवजी तालुका किंवा पंचायत समिती स्तरावर संबंधित विभागामार्फत छाननी करून निवडावेत. कृषी, आरोग्य आणि समाजकल्याण विभागांच्या योजनांच्या विशेष ग्रामसभांची प्रशासकीय जबाबदारी त्याच विभागांवर सोपवावी.
Source link
ग्रामपंचायत अधिकाऱ्यावर हल्ल्याच्या निषेधार्थ ग्रामसेवकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा:जळगाव घटनेच्या निषेधार्थ ग्रामसेवकांचा मूक मोर्चा, कामकाजावर बहिष्कार कायम