मराठवाड्यात पावसाने पुन्हा पाठ फिरवल्याने खरीप पिकांवर संकट निर्माण झाले असून शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते धीरज देशमुख यांनी राज्य सरकारने केवळ पावसाची प्रतीक्षा न करता उपलब्ध वैज्ञानिक आणि तांत्रिक पर्यायांचा वाप
.
धीरज देशमुख यांनी सोशल मीडियावरील पोस्टमधून सरकारचे लक्ष मराठवाड्यातील पावसाच्या परिस्थितीकडे वेधले. पावसाअभावी शेतकरी हवालदिल झाला असून अनेक ठिकाणी पिके वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने हवामानाचा वैज्ञानिक अभ्यास करून क्लाऊड सीडिंगचा पर्याय तपासावा, असे त्यांनी म्हटले आहे.
उभी पिके धोक्यात, वैज्ञानिक पर्यायांचा वापर व्हावा
मराठवाड्यातील दुष्काळसदृश परिस्थितीवर चिंता व्यक्त करताना आमदार धीरज देशमुख यांनी सांगितले की, मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांत पावसाने पाठ फिरवल्याने विहिरी, बोअरवेल आणि जलसाठे आटले असून शेतातील पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे बळीराजा अत्यंत हवालदिल झाला आहे.
वैज्ञानिक पर्यायांची चाचपणी गरजेची
“केवळ पावसाची वाट पाहत बसण्यापेक्षा शासनाकडे उपलब्ध असलेल्या वैज्ञानिक आणि तांत्रिक पर्यायांचा तातडीने वापर करण्याची हीच वेळ आहे. क्लाऊड सीडिंग हे तंत्रज्ञान १०० टक्के हमखास पाऊस पाडेलच असा दावा नाही; मात्र ढगांची रचना आणि हवामानाची स्थिती अनुकूल असल्यास तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हा पर्याय नक्कीच तपासून पाहिला पाहिजे.” शेतकरी इतक्या मोठ्या अडचणीत असताना शासनाकडे उपलब्ध असलेला प्रत्येक आधुनिक वैज्ञानिक मार्ग वापरला गेला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांत कृत्रिम पावसाची मागणी
धीरज देशमुख म्हणाले की, “दुष्काळ शेतकऱ्यांच्या दारात उभा ठाकला आहे. देशात उपलब्ध असलेल्या अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून संकटसमयी आपण शेतकऱ्यांसाठी काय करतो, हे सिद्ध करण्याची ही वेळ आहे. कृत्रिम पावसाच्या प्रयोगांमुळे अनेक भागांत शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाल्याचे उदाहरणे आहेत. त्यामुळे राज्य शासनाने विलंब न करता मराठवाड्यासह राज्यातील सर्वच दुष्काळग्रस्त भागांत क्लाऊड सीडिंगचा निर्णय घेऊन बळीराजाला दिलासा द्यावा.”

क्लाऊड सीडिंग नेमके काय आहे?
क्लाऊड सीडिंग म्हणजे आकाशात आधीपासून अस्तित्वात असलेल्या योग्य ढगांमध्ये विशिष्ट सूक्ष्म कण सोडून त्यातील पाण्याचे थेंब किंवा बर्फकण तयार होण्याची प्रक्रिया प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न. विमान किंवा अन्य माध्यमातून ढगांमध्ये विशिष्ट ‘सीडिंग एजंट’ पोहोचवले जातात. त्यानंतर ढगातील सूक्ष्म भौतिक प्रक्रियेत बदल घडवून पर्जन्यवाढ साधण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, क्लाऊड सीडिंग म्हणजे आकाशात ढगच नसताना ढग तयार करून पाऊस पाडणे नव्हे. भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाने यापूर्वी स्पष्ट केले आहे की, क्लाऊड सीडिंग तंत्रज्ञानाचा वापर पर्जन्याची शक्यता असलेल्या आधीच अस्तित्वात असलेल्या ढगांमधून पावसाचे प्रमाण वाढवण्यासाठी होऊ शकतो; पावसाचा अभाव असलेल्या भागात नव्याने पावसाचे ढग निर्माण करण्यासाठी हे तंत्रज्ञान वापरता येत नाही.
भारतीय हवामान विभागानेही क्लाऊड सीडिंगसाठी काही मूलभूत अटी आवश्यक असल्याचे नमूद केले आहे. लक्ष्य क्षेत्रावर योग्य प्रकारचे ढग असणे, ते ढग विकसित होण्याच्या अवस्थेत असणे आणि त्यामध्ये आवश्यक प्रमाणात पाणी असणे महत्त्वाचे आहे. तीव्र दुष्काळाच्या परिस्थितीत ढगच उपलब्ध नसतील तर क्लाऊड सीडिंग प्रभावी ठरण्याची शक्यता कमी असते.
महाराष्ट्रात यापूर्वीही झाला आहे प्रयोग
क्लाऊड सीडिंगच्या प्रयोगासाठी महाराष्ट्राचा संदर्भ महत्त्वाचा आहे. पुण्यातील भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्थेने (IITM) ‘क्लाऊड एरोसोल इंटरॅक्शन अँड प्रिसिपिटेशन एन्हान्समेंट एक्सपेरिमेंट’ म्हणजेच CAIPEEX अंतर्गत महाराष्ट्रातील सोलापूर परिसरात प्रयोग केले आहेत. IITMने 2023 मध्ये प्रसिद्ध केलेल्या CAIPEEXच्या अंतिम अहवालानुसार, सोलापूर परिसरातील प्रयोगांमधून योग्य परिस्थितीत क्लाऊड सीडिंगद्वारे पर्जन्यमान वाढवण्याची क्षमता असल्याचे निष्कर्ष समोर आले.
या प्रयोगांमध्ये केवळ विमानातून ढगांमध्ये कण सोडणे एवढेच केले गेले नव्हते. ढगांची निर्मिती, त्यांची रचना, पाण्याचे थेंब, बर्फकण, वातावरणातील एरोसोल आणि पर्जन्यनिर्मितीची प्रक्रिया यांचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करण्यात आला. प्रयोगांपूर्वी आणि नंतर वातावरणातील बदलांची नोंद घेण्यात आली.
CAIPEEXच्या निष्कर्षांनुसार काही ठिकाणी पर्जन्यमानात लक्षणीय वाढ आढळली होती. उपलब्ध अभ्यासाच्या विश्लेषणानुसार काही ठिकाणी वाढ 46% पर्यंत नोंदली गेली, तर सीडिंग क्षेत्राच्या वाऱ्याच्या दिशेने सुमारे 100 चौरस किलोमीटर परिसरात सरासरी सुमारे 18% वाढ आढळल्याचे अहवालांमध्ये नमूद करण्यात आले आहे. मात्र, या निष्कर्षांचा अर्थ प्रत्येक ढगावर किंवा प्रत्येक हवामानस्थितीत तितकाच परिणाम होईल, असा होत नाही.
‘ढग असतील तरच प्रयोग शक्य’
क्लाऊड सीडिंगबाबत सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आकाशात योग्य ढग असणे. पाऊस पडण्यासाठी आवश्यक वातावरणीय परिस्थितीच नसेल, तर विमानातून सीडिंग एजंट सोडून अपेक्षित परिणाम मिळेलच असे नाही. याच कारणामुळे अशा प्रयोगांसाठी हवामान रडार, उपग्रह निरीक्षण, ढगांचे सूक्ष्म भौतिक विश्लेषण आणि संगणकीय हवामान मॉडेलचा वापर केला जातो. कोणत्या ढगांवर प्रयोग करायचा, कोणत्या वेळी सीडिंग करायचे आणि त्याचा परिणाम किती झाला याचे मोजमाप करणे ही संपूर्ण प्रक्रिया वैज्ञानिक पद्धतीने करावी लागते. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, ढगांची योग्य अवस्था, स्थानिक भौगोलिक परिस्थिती, हवामानशास्त्रीय अभ्यास आणि सीडिंग एजंट योग्य ठिकाणी पोहोचवण्याची क्षमता या सर्व बाबी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे हा प्रयोग म्हणजे तातडीने कुठेही विमान पाठवून पाऊस पाडण्याची साधी प्रक्रिया नाही.
सप्टेंबरमध्येही पावसाबाबत चिंता
देशातील यंदाच्या पावसाच्या स्थितीबाबतही चिंता कायम आहे. 31 ऑगस्ट रोजी भारतीय हवामान विभागाने सप्टेंबरमधील देशाच्या पर्जन्यमानाचा अंदाज जाहीर करताना देशभरातील सप्टेंबरचा पाऊस दीर्घकालीन सरासरीच्या 91% पेक्षा कमी राहण्याची शक्यता व्यक्त केली होती. ऑगस्टमध्ये देशात पावसाची 16% तूट नोंदली गेल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले. या परिस्थितीचा परिणाम खरीप पिकांच्या वाढीवर आणि जमिनीतील ओलाव्यावर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, 2 सप्टेंबरच्या हवामान विभागाच्या विभागनिहाय इशाऱ्यानुसार मराठवाड्यात 2 आणि 3 सप्टेंबरला मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यानंतर 4 ते 8 सप्टेंबरदरम्यान या विभागासाठी कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. त्यामुळे स्थानिक पातळीवरील पावसातील अनिश्चितता कायम असल्याचे दिसते.
शेतकऱ्यांसमोर खरीप पिकांचे संकट
मराठवाड्यातील शेती मोठ्या प्रमाणावर पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे पावसाच्या खंडाचा थेट परिणाम सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद आणि इतर खरीप पिकांवर होतो. पिकांच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर पावसाचा दीर्घ खंड पडल्यास उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता वाढते. याच पार्श्वभूमीवर धीरज देशमुख यांनी सरकारने परिस्थितीचा आढावा घेऊन वैज्ञानिक पर्यायांचा वापर करण्याची मागणी केली आहे. मात्र, क्लाऊड सीडिंग हा पावसाच्या कमतरतेवरचा एकमेव किंवा हमखास उपाय नसून, उपलब्ध परिस्थितीत तज्ज्ञांच्या सल्ल्याने तपासता येणारा पूरक पर्याय म्हणून त्याकडे पाहावे लागणार आहे.
हेही वाचा…
महाराष्ट्रात पुन्हा बरसणार पाऊस!:सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात जोरदार पुनरागमन; विदर्भासह-मराठवाड्यालाही दिलासा, पुढे ऑक्टोबर हीटचा तडाखा

ऑगस्ट महिन्याच्या उत्तरार्धात पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे चिंतेत असलेल्या महाराष्ट्राला सप्टेंबरच्या सुरुवातीलाच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. राज्यात पुढील काही दिवसांत मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे दिसत असून 3 ते 5 सप्टेंबरदरम्यान अनेक भागांत चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे. काही भागांत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी