Headlines

Supriya Sule Leads NCP Protest at CSMT Against Rising Inflation


वाढत्या महागाईच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात आंदोलन करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात खासदार सुप्रिया सुळे सहभागी झाल्या. यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य स

.

सीएसएमटी परिसरात झालेल्या आंदोलनात पक्षाचे मुंबईतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यकर्त्यांनी ‘महागाई की मार नहीं चलेगी’ अशा घोषणा देत सरकारचा निषेध केला. आंदोलनात काही कार्यकर्त्यांनी भाज्या आणि धान्यांचे हार गळ्यात घालून वाढत्या महागाईकडे लक्ष वेधले.

घरात जाऊन आई-बहीण, पत्नीला विचारा…

महागाईवर बोलताना सुप्रिया सुळे यांनी सरकारी आकडेवारी आणि प्रत्यक्ष घरगुती खर्चातील फरकावर प्रश्न उपस्थित केला. “फूड इन्फ्लेशन किती आहे, हा प्रश्नच आहे. तुम्ही घरी जाऊन तुमच्या आई, बहीण किंवा पत्नीला विचारा, किती महागाई झाली आहे. घरातील खर्च कसा भागवायचा, हा प्रश्न आज प्रत्येक कुटुंबासमोर आहे,” असे सुळे म्हणाल्या. त्यांनी दूध, धान्य, भाज्या, कांदा, साखर यांसारख्या वस्तूंच्या किमतींचा उल्लेख करत सामान्य नागरिकांच्या अडचणींकडे सरकारचे लक्ष वेधले. सकाळच्या नाश्त्यापासून ते घरातील रोजच्या स्वयंपाकापर्यंत महागाईचा परिणाम जाणवत असल्याचा दावा त्यांनी केला. “दूध हा मूलभूत पदार्थ आहे. सकाळची सुरुवातच दुधापासून होते. मात्र, त्याचे दरही वाढले आहेत. सामान्य माणसाचे कंबरडे मोडण्याचे काम सरकार करत आहे,” असा आरोप त्यांनी केला.

‘आनंदाचा शिधाही गायब झाला’

राज्य सरकारच्या ‘आनंदाचा शिधा’ योजनेचा उल्लेख करत सुळे यांनी सरकारवर टीका केली. निवडणुकीच्या काळात अनेक योजना आणि सवलतींची चर्चा होते; मात्र निवडणूक संपल्यानंतर त्यांची अंमलबजावणी किंवा सातत्य कुठे दिसते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, आनंदाचा शिधा मिळाल्याने गरीब आणि गरजू कुटुंबांना काही प्रमाणात दिलासा मिळत होता. मात्र आता ही योजना पूर्वीप्रमाणे दिसत नसल्याचा दावा त्यांनी केला. याच संदर्भात त्यांनी ‘लाडकी बहीण’ योजनेचाही उल्लेख केला. निवडणुकीनंतर मोठ्या संख्येने महिलांची नावे योजनेतून कमी करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. या महिलांना आता आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्या म्हणाल्या.

‘शेतकऱ्यांना कर्जमाफीचा न्याय मिळाला का?’

महागाईचा प्रश्न केवळ शहरातील कुटुंबांपुरता मर्यादित नसून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांवरही त्याचा परिणाम होत असल्याचे सुळे यांनी सांगितले. शेतकरी कर्जबाजारी होत आहेत आणि आत्महत्यांसारख्या गंभीर घटना घडत आहेत. सरकारने कर्जमाफीचा मोठा गाजावाजा केला, मात्र प्रत्यक्षात अन्नधान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्याला किती न्याय मिळाला, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. “जो शेतकरी मातीशी इमान राखून आपला अन्नधान्याचा प्रश्न सोडवतो, त्याला न्याय मिळाला पाहिजे. शहरात कष्ट करण्यासाठी आलेल्या नागरिकांनाही महागाईची झळ दररोज बसत आहे,” असे सुळे म्हणाल्या. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागातील नागरिकांच्या जीवनमानावर महागाईचा परिणाम होत असल्याचा दावा त्यांनी केला.

मतदार यादीच्या मुद्द्यावरही सरकारला सवाल

आंदोलनादरम्यान सुप्रिया सुळे यांनी मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षणाच्या प्रक्रियेचाही मुद्दा उपस्थित केला. लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतदारांच्या नावांबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांचा संदर्भ देत त्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. आपल्या मतदारसंघात सुरू असलेल्या एसआयआर प्रक्रियेवर आपण स्वतः दररोज लक्ष ठेवत असल्याचे सुळे यांनी सांगितले. प्रत्येक मतदाराने मतदार यादीत आपले नाव आहे की नाही, हे तपासावे, असे आवाहन त्यांनी केले. “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला एक मताचा अधिकार दिला आहे. हा अधिकार गमावू नका. मतदार यादीत आपले नाव आहे की नाही, हे प्रत्येकाने तपासले पाहिजे,” असे त्या म्हणाल्या. नाव दुबार असल्यास योग्य ती दुरुस्ती करावी आणि नाव यादीतून गायब असल्यास तातडीने प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

मराठा, ओबीसी, आदिवासी, महिला… सगळे रस्त्यावर

आरक्षणाच्या प्रश्नावरही सुळे यांनी सरकारवर टीका केली. मराठा समाज, ओबीसी, आदिवासी, महिला, आश्रमशाळांमधील विद्यार्थी अशा विविध घटकांकडून आंदोलन केले जात असल्याचे त्यांनी म्हटले. सरकारला आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांना वारंवार रस्त्यावर उतरावे लागत आहे, हे दुर्दैवी असल्याचे सुळे म्हणाल्या. “जोपर्यंत आंदोलन शिगेला पोहोचत नाही, तोपर्यंत सरकारला जाग येत नाही,” अशा शब्दांत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.

सोन्याच्या खरेदीवरून मोदींचा गोंधळात टाकणारा संदेश

सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारच्या अर्थव्यवस्थेबाबतच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थव्यवस्थेतील वाढीबाबत सकारात्मक चित्र मांडले असताना दुसरीकडे सोन्याच्या खरेदीबाबत नागरिकांना वेगळा संदेश दिला जात असल्याचे त्यांनी म्हटले. महिलांसाठी सोन्याचे दागिने हे केवळ अलंकार नसून अनेक कुटुंबांसाठी आर्थिक सुरक्षिततेचा आधार असल्याचे सुळे म्हणाल्या. “महिला दोन पैसे वाचवते तेव्हा ती सोने का घेते? ते तिच्यासाठी गुंतवणूक आणि सुरक्षितता असते. कुटुंबावर अडचण आली तर ते सोने विकून मुलांचे शिक्षण किंवा अन्य गरजा भागवता येतात,” असे त्यांनी सांगितले. देशाची अर्थव्यवस्था चांगली चालली असल्याचे सांगितले जात असेल, तर सोन्याच्या खरेदीबाबत वेगळी भूमिका का घेतली जाते, असा सवाल करत त्यांनी केंद्र सरकारकडून ‘गोंधळात टाकणारे संकेत’ दिले जात असल्याची टीका केली.

जीडीपी वाढीचे आकडे आणि अर्थतज्ज्ञांचे मत वेगळे का?

देशाच्या जीडीपी वाढीच्या आकडेवारीचाही सुळे यांनी उल्लेख केला. सरकारकडून अर्थव्यवस्था मजबूत असल्याचे सांगितले जात असताना काही अर्थतज्ज्ञ आणि माजी रिझर्व्ह बँक गव्हर्नर यांच्या मतांकडेही लक्ष द्यावे, असे त्या म्हणाल्या. जीडीपी वाढीचा दर आणि सर्वसामान्यांच्या घरातील आर्थिक परिस्थिती यामध्ये तफावत असल्याचा त्यांचा दावा होता. त्यामुळे केवळ आर्थिक वाढीची आकडेवारी न पाहता नागरिकांच्या प्रत्यक्ष जीवनातील परिस्थितीचा विचार करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरूनही भूमिका

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या मुद्द्यावर बोलताना सुळे यांनी शांततेने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अधिकारांचा आदर केला पाहिजे, असे म्हटले. “आमची मुले आहेत. ती शांतपणे बसून गाणी म्हणत होती आणि न्यायाची मागणी करत होती. त्यात त्यांची काय चूक? संविधानाने त्यांना अधिकार दिला आहे,” असे त्या म्हणाल्या. शांततापूर्ण आंदोलन करण्याचा अधिकार कोणाकडूनही हिरावून घेतला जाऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली.

दिशा सालियन प्रकरणावर ‘सीबीआय चौकशी’बाबत सावध प्रतिक्रिया

मुंबईतील दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्याच्या निर्णयाबाबतही सुळे यांना प्रश्न विचारण्यात आला. या प्रकरणाबाबत आपल्याला माहिती असल्याचे त्यांनी सांगितले; मात्र यापूर्वी न्यायालयीन प्रक्रियेत काय निरीक्षण नोंदवण्यात आले होते, याचा संदर्भ देत पुढील तपासातून नेमके काय समोर येते, याकडे लक्ष द्यावे लागेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. दरम्यान, शिवसेनेच्या पक्षचिन्हासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आणि त्यांच्या पक्षाच्या प्रलंबित प्रकरणाचाही त्यांनी उल्लेख केला. आपल्या पक्षाच्या प्रकरणाची सुनावणी वारंवार पुढे ढकलली जात असून, अनेक वेळा प्रकरण बोर्डावर घेण्याची मागणी करूनही अद्याप तारीख मिळत नसल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली. “लोकशाहीमध्ये आमचे म्हणणे ऐकूनही घेतले जाणार नसेल तर हा कुठला न्याय आणि कुठली लोकशाही?” असा सवाल त्यांनी केला.

महागाई कमी होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार

सीएसएमटी परिसरातील आंदोलनातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने महागाईचा मुद्दा पुन्हा आक्रमकपणे पुढे आणला आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमती, शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती, महिलांवरील आर्थिक भार आणि सरकारी योजनांबाबतचे प्रश्न या मुद्द्यांना पक्षाने आंदोलनाच्या केंद्रस्थानी ठेवले. महागाई कमी करण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलली नाहीत, तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा सुप्रिया सुळे यांनी दिला.

हेही वाचा…

काल आलेला पोरगा काहीतरी बोलतो आणि आपण आंदोलन करतो?:भाजप प्रदेशाध्यक्षांनी टोचले भाजयुमोचे कान, रवींद्र चव्हाण म्हणाले- गुंड तयार करायचे नाहीत

मनसे नेते अमित ठाकरे यांच्या विरोधात भाजप युवा मोर्चाने मुंबईत केलेल्या आंदोलनावरून आता भाजपमध्येच नाराजीचे सूर उमटले आहेत. भाजपच्या मुंबई कार्यकारिणीच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी युवा मोर्चाच्या कार्यपद्धतीवर जाहीरपणे नाराजी व्यक्त करत थेट कानपिचक्या दिल्या. ‘काल आलेला पोरगा काहीतरी बोलतो आणि आपण त्याविरोधात आंदोलन करतो, हे चुकीचे आहे,’ अशा शब्दांत चव्हाण यांनी अमित ठाकरेंविरोधातील आंदोलनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.