![]()
नेपाळमधील नुकत्याच झालेल्या पूर दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या महाराष्ट्रातील नागरिकांचा शोध घेण्यासाठी अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या महाराष्ट्र माउंटेनियर्स रेस्क्यू को-ऑर्डिनेशन सेंटरने (एमएमआरसीसी) राज्यव्यापी मोहीम सुरू केली आहे. बेपत्ता व्यक्तींच्या नातेवाइकांना मदत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सहकार्य करावे, अशी विनंतीही या संस्थेने केली आहे. या मोहिमेअंतर्गत, महासंघाचे जिल्हानिहाय समन्वयक स्थानिक कुटुंबांपर्यंत पोहोचून बेपत्ता नागरिकांची माहिती गोळा करतील. नेपाळ सरकार आणि काठमांडूमधील भारतीय दूतावासाच्या मदतीने सापडलेल्या मृतदेहांच्या ओळख प्रक्रियेची माहिती मिळवून ती राज्य शासनाकडे समन्वयासाठी पाठवली जाईल. पूर दुर्घटनेमुळे महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांचे नातेवाईक बेपत्ता आहेत. ही कुटुंबे अजूनही त्यांच्या परतण्याची वाट पाहत आहेत. या कुटुंबांना योग्य आणि अधिकृत माहिती वेळेत मिळणे खूप महत्त्वाचे आहे. मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी डीएनए जुळणीची गरज भासू शकते. कुटुंबांची माहिती आणि नमुने योग्य यंत्रणांपर्यंत पोहोचल्यास या प्रकरणांवरील कार्यवाहीला वेग येईल, असे संस्थेने सांगितले आहे. बेपत्ता व्यक्तींच्या नातेवाइकांनी नेपाळ पोलिसांच्या अधिकृत वेबसाइटवरील सापडलेल्या मृतदेहांची छायाचित्रे आणि माहिती तपासावी. संबंधित व्यक्तीचे नाव यादीत असो वा नसो, एमएमआरसीसीने प्रसिद्ध केलेला अधिकृत गुगल फॉर्म भरावा. ज्या मृतदेहांची ओळख पटलेली नाही, अशा प्रकरणात नेपाळ सरकार प्रथम श्रेणीतील नातेवाइकांशी डीएनए जुळणी करेल. नागरिकांनी दिलेली सर्व माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल. या माहितीचा वापर फक्त महाराष्ट्र शासनाच्या समन्वयाने बेपत्ता व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी आणि मृतदेह हस्तांतरण प्रक्रियेसाठी केला जाईल. मदत किंवा अधिक माहितीसाठी नागरिकांनी ९३२५०११७१९ किंवा ९८८१०९९७९३ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन एमएमआरसीसीने केले आहे.
Source link
नेपाळ पूर दुर्घटनेतील बेपत्ता महाराष्ट्रीयांच्या शोधासाठी मोहीम:अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने हाती घेतली; शासनाला सहकार्याची विनंती