Headlines

डॉ. राजेंद्र रूपनवर आत्महत्या प्रकरण:फलटण उपजिल्हा रुग्णालयाला हजारो नागरिकांचा घेराव, प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त




फलटण उपजिल्हा रुग्णालयातील तत्कालीन तदर्थ वैद्यकीय अधिकारी राजेंद्र रूपनवर यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या मागण्यांसाठी बुधवारी हजारो नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालयासमोर घेराव घातला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी सकाळपासून कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. फलटण पोलीस उपविभागाचे उपविभागीय अधिकारी धन्यकुमार गोडसे यांनी सकाळपासून उपजिल्हा रुग्णालयात तळ ठोकून बंदोबस्ताचे नियोजन केले, मात्र काही वेळातच रुग्णालयासमोर हजारो नागरिक जमा झाले. दुपारी तीनच्या सुमारास फलटणच्या प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर यांनी उपजिल्हा रुग्णालयात येऊन रूपनवर कुटुंबीयांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनातील सर्व मागण्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून तातडीने शासनाकडे पाठवण्याचे आश्वासन दिले. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्याबाबतचा अहवाल जिल्हा पोलीस प्रमुखांकडून शासनाकडे पाठवण्यासाठी आवश्यक कार्यवाही बुधवारीच पूर्ण केली जाईल, असे धन्यकुमार गोडसे यांनी सांगितले. सार्वजनिक आरोग्य विभागानेही प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर नियमानुसार योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संचालकांनी दूरध्वनीवरून राजेंद्र रूपनवर यांच्या पत्नीशी चर्चा करून कुटुंबीयांचे सांत्वन केले आणि प्रकरणाची माहिती घेतली. सार्वजनिक आरोग्य विभाग रूपनवर कुटुंबीयांच्या पाठीशी असून दोषींवर नियमानुसार योग्य कारवाई केली जाईल, असे आश्वस्त करण्यात आले. तसेच कुटुंबीयांनी प्रशासनाला सहकार्य करावे, अशी विनंती आरोग्य सेवा संचालनालयाचे संचालक विजय कंदेवाड यांनी पत्राद्वारे केली. आरोग्य विभागाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर नागरिकांनी राजेंद्र रूपनवर यांचे पार्थिव उपजिल्हा रुग्णालयातून त्यांच्या मूळगावी फडतरी (मांडवी), ता. माळशिरस येथे अंत्यविधीसाठी नेले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *