![]()
कौटुंबिक वादातून लाकडी दांडक्याने मारहाण करून एका व्यक्तीची हत्या करणाऱ्या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात एका आरोपीची निर्दोष मुक्तताही करण्यात आली. आजन्म कारावासाची शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव गोपाल उर्फ गोलू रामदास शिंदे (२७, दसरा मैदान, अमरावती) असे आहे. याच प्रकरणातील अन्य एक आरोपी राजू लक्ष्मण शिंदे (४२) याची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. मृत व्यक्तीचे नाव नारायण तुकाराम जाधव होते. राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दसरा मैदानजवळील हनुमान मंदिराच्या बाजूला १२ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली होती. दोन्ही आरोपींनी नारायण जाधव यांच्यावर लाकडी दांडक्याने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले होते. हल्ल्यानंतर जाधव यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३०२ सह कलम ३४, ३,२ (व्ही) आणि अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून आवश्यक पुरावे गोळा केले आणि न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणात एकूण बारा साक्षीदार तपासले गेले. सादर केलेले पुरावे आणि साक्षीदारांच्या साक्षी या आधारे न्यायालयाने आरोपी गोपाल रामदास शिंदे यास दोषी ठरवले. त्यामुळे गोपाल शिंदे याला भारतीय दंड संहिता कलम ३०२ अन्वये आजन्म कारावास आणि २ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. दंड न भरल्यास त्याला २ महिने सश्रम कारावासाची शिक्षा भोगावी लागेल. आरोपी क्रमांक २, राजू लक्ष्मण शिंदे याला न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता ॲड. प्रशांत विजयराव देशमुख यांनी युक्तीवाद केला. तपासात ए.एस.आय. दिलीप सावरकर व कोर्ट पैरवी जमादार अरुण हटवार यांनी त्यांना मदत केली.
Source link
लाकडी दांडक्याने मारहाण करून हत्या:अमरावती जिल्हा न्यायालयाने आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली, एकाची निर्दोष मुक्तता