![]()
दर्यापूर शहर आणि परिसरात बेकायदेशीर सावकारी व्यवसायाविरोधात सहकार विभागाने कारवाई केली आहे. बुधवारी, २ सप्टेंबर रोजी जिल्हा उपनिबंधक राजेश भुयार यांनी पाच पथके तयार केली. या पथकांनी एकाच वेळी पाच वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकल्या. या धाडींमध्ये तीन ठिकाणांहून संशयास्पद दस्तऐवज जप्त करण्यात आले. दर्यापूर येथील सहायक निबंधक कार्यालयाकडे गेल्या काही दिवसांपासून अनेक तक्रारी आल्या होत्या. या तक्रारींच्या आधारेच ही कारवाई करण्यात आली. सकाळी १० वाजून २० मिनिटांनी सुरू झालेली ही कारवाई दुपारी १ वाजेपर्यंत चालली. सिव्हिल लाईन परिसरात तिवसा येथील सहायक निबंधक प्रीती धामणे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने एका महिलेच्या घरी कारवाई केली. या कारवाईत १० संशयास्पद दस्तऐवज जप्त करण्यात आले. यात कोरे धनादेश, कोरे स्टॅम्प आणि स्थावर मालमत्ता खरेदीखताचा समावेश आहे. मोर्शी येथील सहायक निबंधक स्वाती गुडधे यांच्या पथकाने दुसऱ्या एका महिलेच्या घरातून ७ संशयास्पद कागदपत्रे जप्त केली. यात कोरे धनादेश, इसार चिठ्ठी आणि खरेदीखताचा समावेश आहे. ही कागदपत्रे सील करण्यात आली आहेत. गजानन कॉलनी परिसरात नांदगाव खंडेश्वरचे सहायक निबंधक सचिन पतंगे यांच्या पथकाने १२ संशयास्पद दस्तऐवज जप्त केले. यामध्ये डायरी, कोरे धनादेश, कोरे स्टॅम्प आणि खरेदीखतांचा समावेश आहे. वरुडचे सहायक निबंधक आशिष चर्जन यांच्या चौथ्या पथकाने साईनगरमधील एका महिलेच्या घरी पाहणी केली. अमरावती येथील डीडीआर कार्यालयातील सहायक निबंधक अनिरुद्ध राऊत यांच्या पथकाने बनोसा येथील राहुल सुभाष प्रांजळे यांच्या घरी धाड टाकली. प्रांजळे यांच्याकडे कोणतेही संशयास्पद दस्तऐवज आढळले नाहीत. मात्र, चौथ्या पथकाच्या कारवाईत १२ संशयास्पद दस्तऐवज आढळून आले. सहकार विभागाच्या या कारवाईमुळे बेकायदेशीर सावकारी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. जप्त केलेल्या सर्व कागदपत्रांची पडताळणी महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ मधील तरतुदींनुसार केली जाईल. अमरावतीचे विभागीय सहनिबंधक गौतम वर्धन आणि जिल्हा उपनिबंधक राजेश भुयार यांच्या मार्गदर्शनाखाली दर्यापूरचे सहायक निबंधक अनिरुद्ध राऊत पुढील कायदेशीर कारवाई आणि पडताळणी करतील.
Source link
दर्यापुरात अवैध सावकारीवर सहकार विभागाची धाड:पाच पथकांनी तीन ठिकाणांहून कोरे धनादेश, स्टॅम्पसह संशयास्पद दस्तऐवज जप्त केले