![]()
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टपासून अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या पाचव्या दिवशी भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांबाबत जाहीरपणे सकारात्मकता दर्शवली. मात्र, या आश्वासनानंतरही मनोज जरांगे पाटील हे आपल्या भूमिकेवर पूर्णपणे ठाम राहिले आहेत. आपली भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले, “किमान चार प्रमाणपत्र दिल्याशिवाय उपोषण सोडणार नाही. हैदराबाद गॅझेट प्रमाणपत्राचे वाटप सुरू होऊ द्या मग बघू.” या प्रमाणपत्रांचे वाटप मराठवाड्यातूनच सुरू व्हावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. “पाणी पितो पण उपोषण सोडणार नाही,” असा निर्धार व्यक्त करत, जोपर्यंत सर्व मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण थांबणार नाही, असे जरांगे पाटील यांनी सर्वांसमोर स्पष्ट केले. मोठ्या भावाच्या रुपाने आलो यावेळी प्रसाद लाड यांनी बोलताना म्हटले की, दादा, मी विनंती करायला आलो आहे. मी पहिल्या दिवसापासून आपल्याला सांगतोय उपोषण करु नका. तुमच्या मनात जे आहे तेच होणार आहे. तुमचा विषय सोडवण्यासाठी आम्ही आहोत. काल रात्रीपासून मलाही झोप लागली नाही. डोळ्यात अश्रु आहेत. मी आज तुमचा भाऊ म्हणून आलोय. जरांगेंना साथ देण्यासाठी आलो आहे. त्यांच्या 15 मागण्याची उत्तर पाठवली होती. दादांना प्रशासनाशी बोलायचे नव्हते. त्यांच्या मोठ्या भावाच्या रुपाने आलो आहे. अर्ज केला नाही तर प्रमाणपत्र कसे मिळणार? पुढे बोलताना प्रसाद लाड यांनी म्हटले की, राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींमंध्ये नोंदी लावल्या जाणार आहेत. जिल्हानिहाय पेन ड्राईव दिले आहेत. आपण 6 कोटी मराठे आहोत. आपण कमी नाही आहोत. अर्जदारांनी फक्त अर्ज करायला पाहिजे. अर्ज केला नाही तर प्रमाणपत्र कसे मिळणार? जिल्हानिहाय नोडल ऑफिसर नेमला आहे. मंत्रालयातही कक्ष स्थापण करत आहोत. हैदराबाद गॅजेटनुसार प्रमाणपत्र देण्याचे काम उद्या 12 वाजेपर्य़त सुरु करणार. पहिले प्रमाणपत्र दादांच्या हातातून देणार आहे. शिंदे-फडणवीस सरकार दादांच्या मागे उभे आहे, असे लाड यांनी सांगितले. शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो… आम्ही सगळे इथे आलो आहोत, आम्ही तत्काळ इथे निर्णय करणार आहोत. मी दादांना सांगितले होते की, नतद्रष्ट लोकांनी आरक्षण रद्द होण्यासाठी कोर्टात याचिका दाखल केली होती. पण फडणवीस आणि शिंदे सरकार पाठीशी आहे. साठे साहेब राज्याचे एजी आहेत. हैदराबाद गॅझेट साठी आपण त्यांना उभे केले आहे. शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो की हे रद्द होऊ देणार नाही, असेही प्रसाद लाड यांनी यावेळी म्हटले. मराठा आरक्षणाबाबत सरकारच्या महत्त्वपूर्ण घोषणा आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिलेल्या आश्वासनांनुसार, ओबीसी समाजाला मिळणाऱ्या सर्व सवलती आता मराठा समाजालाही लागू करण्यात येणार आहेत. तसेच, जरांगे पाटील यांच्या प्रमुख मागणीनुसार हैदराबाद गॅझेटच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्यास सरकारने मान्यता दिली असून, राज्यात एकूण 58 लाख कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप केले जाणार आहे. याशिवाय, ‘बार्टी’ आणि ‘महाज्योती’च्या धर्तीवर ‘सारथी’ संस्थेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आश्वासन देतानाच, मंत्रालयात मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी एक स्वतंत्र कक्ष (कार्यालय) स्थापन करण्याची महत्त्वपूर्ण घोषणाही लाड यांनी यावेळी केली आहे. या संदर्भातील ही देखील बातमी वाचा.. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 5 वा दिवस:जरांगेंची प्रकृती खालावली, पण भूमिकेवर ठाम, अनेक जिल्ह्यात आंदोलनाचे पडसाद मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 5 वा दिवस आहे. प्रकृती खालावलेली असतानाही जरांगे पाटील आपल्या उपोषणाच्या भूमिकेवर ठाम आहेत. मंगळवारी रात्री जालन्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी उपोषणस्थळी भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. वाचा सविस्तर
Source link
'पाणी पितो पण उपोषण सोडणार नाही':प्रसाद लाड यांच्या भेटीनंतरही मनोज जरांगे भूमिकेवर ठाम; आरक्षणाबाबत सरकारच्या मोठ्या घोषणा