![]()
जमीन विकल्याच्या कारणावरून दोन मुलांनी आपल्या वृद्ध आई-वडिलांना भररस्त्यात अडवून काठीने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार इंदापूर तालुक्यात घडला. ६५ वर्षीय वडील पत्नीसमवेत रस्त्यावर फिरण्यासाठी गेले असताना कारमधून आलेल्या दोन्ही मुलांनी त्यांना अडवले. त्यानंतर आईच्या नावावरील जमीन विकल्याच्या कारणावरून वाद घालत दोघांनीही आई-वडिलांना मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला. या प्रकारानंतर तुकाराम राऊत यांनी इंदापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी संजय तुकाराम राऊत आणि राजेंद्र तुकाराम राऊत (दोघेही रा. मालवाडी क्रमांक २, इंदापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुकाराम किसन राऊत (रा. सरस्वतीनगर, इंदापूर) हे पत्नी अंजना राऊत यांच्यासोबत तरंगवाडी गावच्या हद्दीतील सलीम लॉन्सजवळ रस्त्यावर फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी कारमधून त्यांचे मुले संजय तुकाराम राऊत आणि राजेंद्र तुकाराम राऊत तेथे आले. दोघांनी आई अंजना यांच्या नावावरील जमीन विकल्याबाबत आई-वडिलांना जाब विचारला. यावरून त्यांच्यात वाद झाला. वाद वाढल्यानंतर दोन्ही मुलांनी वडील तुकाराम आणि आई अंजना यांना मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
Source link
जमीन विकल्याने वृद्ध आई-वडिलांना रस्त्यात मारहाण:इंदापूरमध्ये दोन्ही मुलांविरुद्ध गुन्हा दाखल