Headlines

पैठणला 3 तर आळंद येथे 1 तास रास्ता रोको‎:मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस; मागण्यांकडे आंदोलनकर्त्यांनी वेधले शासनाचे लक्ष‎


.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आळंद येथे मराठा समाज बांधवांच्या वतीने एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. फुलंब्री-सिल्लोड या महामार्गावर बुधवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास हे आंदोलन पार पडले. आंदोलकांनी रस्त्यावर उतरून ‘एक मराठा, लाख मराठा’च्या गगनभेदी घोषणा देत शासनाचा तीव्र निषेध नोंदवला.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे सुरू केलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी पैठण शहरातील सह्याद्री चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने बुधवारी ३ तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. पैठण-छत्रपती संभाजीनगर मुख्य रस्त्यावर पार पडलेल्या या आंदोलनात आंदोलकांनी भररस्त्यात टायर जाळून शासनाच्या उदासीन भूमिकेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला.

आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस असून त्यांची प्रकृती खालावत चालल्याने पैठण तालुक्यातील मराठा समाजात तीव्र संतापाची लाट पसरली आहे. शासनाने आता मराठा आरक्षणाचा प्रश्न अधिक काळ प्रलंबित न ठेवता तातडीने सकारात्मक आणि ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. या वेळी ‘एक मराठा, लाख मराठा’ आणि ‘आरक्षण आमच्या हक्काचे’ अशा घोषणांनी संपूर्ण सह्याद्री चौक परिसर दणाणून गेला होता.

या आंदोलनामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांसोबतच शाळा, कॉलेजच्या विद्यार्थ्यांनीही मोठ्या संख्येने सहभागी होऊन आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दिला. यावेळी प्रशासनाला निवेदन देण्यात आले. शिष्टमंडळाने तहसील प्रशासन व पोलिस प्रशासनाला मागण्यांचे निवेदन सुपूर्द केले. उपोषणाची दखल न घेतल्यास आंदोलन तीव्रचा इशारा समाजबांधवांनी दिला. माहिती मिळताच वडोद बाजार ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

निवेदन स्वीकारल्यानंतर पोलिसांनी वाहतूक पूर्ववत सुरळीत केली. सुमारे एक तास चाललेल्या या रास्ता रोको आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांची काही गैरसोय होती. या आंदोलनात आळंद व परिसरातील मराठा समाजबांधव हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते.

आंदोलनाच्या शेवटी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सोनाली पाईकराव यांना सकल मराठा समाजाच्या वतीने मागण्यांचे निवेदन सोपवण्यात आले. आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी डॉ. सोनाली पाईकराव आणि पोलिस निरीक्षक महादेव गोमारे यांनी सह्याद्री चौक परिसरात बंदोबस्त तैनात केला होता. पोलिसांच्या नियोजनामुळे हे आंदोलन शांततेत पार पडले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *