![]()
भक्ती संगम परिवार, अकोला च्या वतीने “वारीचे सामाजिक दायित्व : संविधान समता दिंडी’ या विषयावर वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज निसर्गोपचार केंद्र, रणपिसेनगर येथे आयोजित परिसंवादाचा समारोप झाला. वारी म्हणजे महाराष्ट्रातील प्राचीन आणि पवित्र भक्ती परंपरा आहे. वारीत माणसाचे सर्व अहंकार गळून पडतात. जात, धर्म, उच्च-निच असा कोणताही भेदभाव न मानता सर्व स्तरातील लोक आनंदाने भक्तीत तल्लीन होतात. राष्ट्रनिर्माणासाठी वारीचा सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक, आर्थिक, प्रागतिक अशा सर्व अंगाने अभ्यास, संशोधन आणि चिंतन करण्याची गरज आहे. वारीचे सामाजिक दायित्व म्हणजेच संविधान समता दिंडी असल्याचे प्रतिपादन निवृत्त अभियंता सुभाष पुंडकर यांनी केले. परिसंवादात पुणे येथील भक्ती संगम समुहाचे संयोजक दत्ता पाकिरे, ज्येष्ठ सत्यशोधक महादेवराव भुईभार, सर्वोदयी श्रीकृष्ण विखे पाटील, शिक्षण संस्था संचालक मंडळाचे विभागीय अध्यक्ष विजय कौसल यांनी परिसंवादात सहभाग घेतला. संतांनी शेकडो वर्षांपासून कर्मकांड, जातीभेद, स्त्रीदास्य व अंधश्रद्धेविरुद्ध आवाज उठवला, असे दत्ता पाकिरे म्हणाले. समाजात समता, बंधुता व सामाजिक ऐक्याची रुजवण केली. संतांच्या याच विचाराची पेरणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानात केली. या संत परंपरेच्या विचाराचा वारसा म्हणजे संविधान समता दिंडी असल्याचे प्रतिपादन राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते पाकिरे यांनी केले. ते पुढे म्हणाले, वारी ही केवळ भक्तीची यात्रा नाही, तर ती समतेची चळवळ आहे. पंढरपूरच्या वारीत कोणताही भेदभाव नाही. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ यांनी आपल्या अभंगातून अंधश्रद्धेवर प्रहार केला. हाच खरा पुरोगामी महाराष्ट्र आहे, असेही ते म्हणाले. परिसंवादाचे सूत्रसंचालन भक्ती संगम समूह, महाराष्ट्र चे विदर्भ विभागीय संयोजक बबनराव कानकिरड यांनी केले. आभार श्रीकृष्ण माळी यांनी मानले. सर्वधर्म प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज निसर्गोपचार संस्थेचे अध्यक्ष गोवर्धन खवले, डॉ. का. ज. दाते, संगीता नवले, आकाश इंगळे यांच्यासह वारकरी संप्रदायातील मान्यवर, नागरिक उपस्थित होते. संतांच्या विचाराची पेरणी आवश्यक: विजय कौसल : “खेळ मांडियेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे। क्रोध अभिमान केला पावटणी, एकाएका लागतील पायी रे।।” भक्तीच्या खेळात जात, धर्म, लिंग, वय, भाषा, प्रांत असा कसलाही भेदभाव न पाळता संतांनी सर्वांनाच एकमेकांना लोटांगण घालायला लावले आणि सर्वांनाच माऊली बनवले. ही संत विचाराची ताकद आहे. संतांच्या विचाराची पेरणी करून समाजात संविधानाची रुजवणूक करण्यासाठी ह.भ.प. शामसुंदर सोन्नर महाराज यांनी संविधान समता दिंडीची धुरा खांद्यावर घेतली असल्याचे प्रतिपादन विजय कौसल यांनी केले. वारी म्हणजे केवळ विठ्ठलभक्तीची आस धरून चालणे नाही, तर स्वच्छता, संयम, शिस्त, स्वावलंबन, व्यसनमुक्ती, पर्यावरण रक्षण आणि अंधश्रद्धा निर्मूलन हे सुद्धा वारीचे सामाजिक दायित्व आहे, असे मत श्रीकृष्ण विखे यांनी व्यक्त केले. विठोबा-रखुमाई हे कष्टकरी वर्गाचे दैवत : भुईभार पंढरपूरचा विठोबा-रखुमाई हे कष्टकरी वर्गाचे दैवत आहे. शेकडो वर्षांपासून दबल्या-पिचल्या स्त्रियांनाही वारकरी संप्रदायाने संतपद बहाल केले. विठ्ठलाने त्यांच्यात पुरुषप्रधान समाजाविरुद्ध लढण्याची शक्ती दिली, असे भावोद्गार कृषी कीर्तनकार महादेवराव भुईभार यांनी काढले.
Source link
वारी म्हणजे महाराष्ट्रातील प्राचीन, पवित्र भक्ती परंपरा- सुभाष पुंडकर:"वारीचे सामाजिक दायित्व, संविधान समता दिंडी'' वर मंथन