![]()
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) कार्यालयात महाव्यवस्थापक तसेच नागपूर व भुसावळ विभागातील खासदारांची संयुक्त बैठक पार पडली. यात जिल्ह्याशी संबंधित असलेल्या ऐतिहासिक शकुंतला रेल्वे (मूर्तिजापूर-अचलपूर- यवतमाळ) ब्रॉडगेज प्रकल्पासह, अकोलामार्गे धावणाऱ्या प्रवासी गाड्या पूर्ववत सुरू करण्याच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. पश्चिम विदर्भ व अकोला परिसरातील प्रवाशांच्या हक्काच्या मागण्या रेल्वे प्रशासनासमोर मांडण्यात आल्या. जिल्ह्यातील नोकरदार, विद्यार्थी, छोटे व्यापारी आणि सर्वसामान्य प्रवाशांची जीवनवाहिनी ठरलेली नागपूर- भुसावळ पॅसेंजर कोरोना काळापासून बंद असल्याने अकोला-बडनेरा-भुसावळ दरम्यानच्या छोट्या स्थानकांवरील प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. ही गाडी पूर्ववत सुरू करण्याची मागणी बैठकीत करण्यात आली. यासोबतच काझीपेट- एलटीटी आनंदवन एक्स्प्रेस आणि एलटीटी–टाटानगर अंत्योदय एक्स्प्रेस या अकोल्याहून जाणाऱ्या गाड्याही पुन्हा सुरू करण्याचा आग्रह धरण्यात आला. तसेच अचलपूर- मूर्तिजापूर- यवतमाळ नॅरोगेज मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याचा प्रश्न रखडला आहे. यावर रेल्वे प्रशासनाने माहिती दिली की, या प्रकल्पाचे फिल्ड सर्वेक्षण पूर्ण झाले असून आता भू-तांत्रिक तपासणी, वाहतूक सर्वेक्षण, अभियांत्रिकी आराखडा व सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. अचलपूर-मुर्तिजापूर-य वतमाळ ब्रॉडगेजमुळे मूर्तिजापूर हे विदर्भातील मोठे रेल्वे जंक्शन म्हणून विकसित होईल; शेतकरी व व्यापाऱ्यांना मोठा फायदा होईल. नागपूर- भुसावळ पॅसेंजर पुन्हा सुरू झाल्यास अकोला, बोरगाव मंजू, काटेपूर्णा, माना आदी छोट्या स्थानकांतील प्रवाशांचा रोजचा त्रास संपेल. अकोला-अमरावती भागातील मुंबई प्रवाशांसाठी १२११२ अंबा एक्स्प्रेस दादरऐवजी सीएसएमटीपर्यंत चालवण्यास प्रशासनाने हिरवा कंदील दाखवला.
Source link
रेल्वेचे प्रश्न; महाव्यवस्थापकांसोबत मंथन:अकोला- भुसावळ मार्गावरील गाड्या पूर्ववत करण्याची मागणी; चर्चेदरम्यान सुविधांवर भर