![]()
वर्धा येथील एका अकॅडमीचे संचालक नितेश कराळे यांनी मेहतर वाल्मिकी समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत समाज बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. महाराष्ट्र राज्य मेहतर वाल्मिकी समाज बावनी पंचायतने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही सादर केले
.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे. त्या व्हिडिओत त्यांनी वाल्मिकी मेहतर समाज व मातंग समाजाबाबत आक्षेपार्ह भाष्य केल्याचा आरोप समाजबांधवांनी केला. गलिच्छ भाषेत इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी अनुसूचित जाती जमाती अत्याचार विरोधी कायदा १९८९ मध्ये स्पष्ट आहे की, कोणत्याही समाजाबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणे गुन्हा आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. वाल्मिकी व मातंग समाज अनुसूचित जातीतील महत्त्वाच्या समाज आहे. त्यांच्या भावना व सामाजिक प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारी वक्तव्य निषेधार्हच आहे, असे समाजबांधव म्हणाले.
सामाजिक जीवनात काम करणाऱ्या व्यक्तींनी कोणत्याही समाजाबद्दल वक्तव्य करताना जबाबदारी आणि संवेदनशीलता बाळगणे गरजेचे आहे. कोणत्याही समाजाचा इतिहास सांगताना समाजाला चुकीच्या शब्दाने संबोधित करून इतिहास सांगणे हे समाजाचा सन्मान कमी करण्या सारखे आहे. कथित मास्तरानी जर असे वक्तव्य केले तर त्याचा परिणाम विद्यार्थ्यांवर काय होईल, त्यांची मानसिकता समाजाबद्दल काय होईल, याचा विचार करणे गरजेचे आहे. त्यांनी केलेले वक्तव्याने समाजात प्रचंड रोष निर्माण झाला आहे. समाजात आक्रोशाची भावना निर्माण झाली आहे, अशा शब्दात समाजबांधवांनी भावना व्यक्त केल्या. निवेदन देताना रमेश गोडाले, अनुप खरारे, प्रकाश घोगलिया, मनोज सारवान, राजू थामेत, राजा सारवान, गुरु सारवान, अमर डीकाव, नरेंद्र गोडाले, नीलेश घावरे, राजेश मेवाते, पंकज कांबळे विजू गोडाले उपस्थित होते. कराळे मास्तरानी यापूर्वी सुद्धा विविध समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केली आहेत, असे समाजबांधव म्हणाले. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, त्यासह त्यांचा सुरू असलेला कोचिंग क्लासची मान्यता रद्द करण्यात यावी, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, जेणेकरून असे कोणतेही प्रकार संपूर्ण महाराष्ट्रात घडणार नाही व प्रत्येक समाजाला सन्मानाची वागणूक मिळेल, असे समाजबांधव म्हणाले. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात राहतो. महाराष्ट्र राज्याला शाहू महाराज, महात्मा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार लाभलेले आहे. राज्यातील प्रत्येक समाजाला समानतेची भावना राहील व सन्मान मिळावा, असे समाजबांधव म्हणाले.
याआधीही आक्षेपार्ह विधाने, क्लासची मान्यता रद्द करून कराळेंवर कारवाईची मागणी