.

मोहोळ लाडक्या गणरायाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने गणपती मूर्तिकारांच्या कार्यशाळांमध्ये मूर्तींना अंतिम रूप देण्याची लगबग सुरू झाली आहे. मूर्तिकार विशाल कुंभार यांच्यासह कुटुंबीय गणपती मूर्तींवर अखेरचा हात फिरवण्यात व्यग्र असून, मागील १३ दिवसांपासून घरगुतीसह सार्वजनिक गणेश मंडळांकडून मूर्ती बुकिंगसाठी गर्दी होत आहे. यंदा गणपती मूर्ती तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या दरात मोठी वाढ झाली आहे.
मागील वर्षी पीओपीची २५ किलोची बॅग सुमारे २१० रुपयांना मिळत होती. यंदा त्याच बॅगेसाठी २६० रुपये मोजावे लागत आहेत. त्याचबरोबर गणपती मूर्तींना रंगाच्या बादलीचे दर मागील वर्षी ६ हजार रुपये होता, तो यंदा तब्बल ८ हजार रुपयांवर पोहोचला आहे. याशिवाय मजुरीच्या दरातही वाढ झाल्याने मूर्तींच्या उत्पादन खर्चात वाढ झाली आहे.
कच्चा माल, रंगासह मजुरीच्या वाढलेल्या दराचा परिणाम गणपती मूर्तींच्या किमतीवर झाला असून, यंदा मूर्तींच्या दरात मागील वर्षाच्या तुलनेत ३० ते ३५ टक्क्यांनी वाढ होणार आहे. त्यामुळे घरगुती गणपती खरेदी करणाऱ्या भाविकांसह सार्वजनिक गणेश मंडळांनाही यंदा अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. ^गणपती मूर्ती तयार करण्यासाठी सहा ते सात महिन्यांपासून आमचे कुटुंब मेहनत घेत आहे.
यंदा पीओपी रंगासह इतर साहित्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्याचबरोबर मजुरीचाही खर्च वाढला आहे. त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत यंदा गणपती मूर्तींच्या दरात ३० ते ३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.भाविकांच्या मागणीनुसार विविध आकारांच्या आकर्षक मूर्ती तयार केल्या असून, गणरायाच्या आगमनासाठी सर्व मूर्तींना अंतिम रूप देण्याचे काम सध्या वेगात सुरू आहे. महादेव कुंभार, मूर्तिकार
^ मूर्ती तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. घरगुती गणपतीच्या छोट्या मूर्तींपासून ते सार्वजनिक मंडळांसाठीच्या मोठ्या मूर्तींना आकर्षक रूप देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. वाढलेल्या दरामुळे यंदा घरगुती गणपतीबरोबरच सार्वजनिक गणेश मंडळांच्या बजेटवरही अतिरिक्त भार पडणार आहे. नरेंद्र कुंभार मूर्तिकार.…