शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या मालकी हक्काबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना निकालापूर्वी त्यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. पुण्यात आयोजित
.
पक्ष-चिन्ह निकालावर निकालाआधी बोलणे अयोग्य
सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाबाबत सुरू असलेल्या सुनावणीवर विचारले असता शरद पवार म्हणाले, “न्यायालयातील सुनावणी अजून संपलेली नाही, ती सध्या सुरू आहे. अंतिम निकाल येण्यापूर्वी आम्ही त्यावर कोणतेही भाष्य करणे हे दोन्ही बाजूंच्या हिताचे नाही. न्यायालयाचा निकाल काय येतो, हे पाहिल्यानंतरच खरी वस्तुस्थिती स्पष्ट होईल.”
विद्यार्थी आंदोलनावरून सरकारला न्यायालयाचा इशारा
विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या आणि त्यांच्या आंदोलनावर बोलताना पवारांनी राज्य सरकारच्या धोरणांवर बोट ठेवले. “विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची आणि मागण्यांची सरकारने गांभीर्याने दखल घेतली पाहिजे. सरकारने घेतलेले धोरण कसे चुकीचे आहे, हे न्यायदेवतेने स्पष्टपणे दाखवून दिले आहे. जर तुम्ही योग्य पद्धतीने निर्णय घेतले नाहीत, तर आम्हाला हस्तक्षेप करून निर्णय घ्यावे लागतील, असा कडक इशाराच न्यायालयाने सरकारला दिला आहे,” असे पवार यांनी नमूद केले.

“साखर आयात करणे चुकीचे; शेतकऱ्यांना फायदा नाही”
साखरेच्या वाढत्या दरांवर आणि केंद्र सरकारच्या आयात धोरणावर पवारांनी चिंता व्यक्त केली. “बाजारपेठेत साखरेचे दर वाढत असले तरी त्याचा थेट फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होताना दिसत नाही. खते, मशागत असा उत्पादन खर्च वाढतो आहे. त्यामुळे वाढलेल्या दरातील योग्य हिस्सा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला हवा.”
“साखरेची आयात करणे कोणत्याही दृष्टीने योग्य नाही. आयात केलेली नवीन साखर बाजारपेठेत आल्यावर स्थानिक साखर उद्योग आणि शेतकऱ्यांना त्याचा काय फटका बसेल, याचा विचार होणे गरजेचे आहे.”
पेरणी सोडा, पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न
राज्यातील पावसाच्या खंडामुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश स्थितीवर पवार यांनी चिंता व्यक्त केली. “पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने परिस्थिती चिंताजनक झाली आहे. मी ज्या ज्या भागात फिरत आहे, तिथे दुबार पेरणी सोडाच, पण पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे.” निसर्गाच्या या अवकृपेमुळे बळीराजा संकटात सापडला असून, संकटग्रस्त नागरिकांना बाहेर काढण्यासाठी सर्वांनी मिळून हातभार लावण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
तुकाराम मुंढेंच्या कारवाईमुळे भेसळमुक्त दूध
अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेल्या धडक मोहिमेचे शरद पवार यांनी स्वागत केले. “एफडीएने केलेल्या कठोर कारवाईमुळे दुधातील भेसळ थांबली आहे. भेसळयुक्त दूध बंद झाल्यामुळे शुद्ध दुधाची मागणी वाढली आणि परिणामी दर ६० रुपयांवरून 80 रुपयांपर्यंत गेले आहेत.”
“चांगले आणि शुद्ध दूध मिळत असल्याने ग्राहकही दोन पैसे अधिक मोजायला तयार आहेत, ही सकारात्मक बाब आहे,” असे पवार म्हणाले.
16 ऑक्टोबरला पंतप्रधान मोदी बारामती दौऱ्यावर?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संभाव्य बारामती दौऱ्याबाबत विचारले असता पवारांनी सांगितले, “पंतप्रधान बारामतीला येण्याचे नियोजन आहे, मात्र अद्याप तारीख निश्चित झालेली नाही. १६ ऑक्टोबर रोजी ते येण्याची शक्यता आहे. विद्या प्रतिष्ठानमधील नक्षत्र उद्यानासह विविध उपक्रमांचे उद्घाटन आणि सादरीकरण या वेळी होणार आहे. सुप्रिया यांच्या मुलीच्या लग्नात काही सहकाऱ्यांनी पंतप्रधानांना प्राथमिक सादरीकरण दिले होते, ते सविस्तर समजून घेण्यासाठी पंतप्रधान उत्सुक आहेत.”
मराठा आरक्षण आणि विखे पाटलांच्या टीकेला प्रत्युत्तर
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर बोलताना पवार म्हणाले, “आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी सरकारचे मंत्री आंदोलकांना भेटायला गेले आहेत, आता पुढे काय निर्णय होतो ते पाहावे लागेल.” तसेच, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी १९९४ च्या आरक्षणावरून केलेल्या अप्रत्यक्ष टीकेला प्रत्युत्तर देताना पवार म्हणाले, “१९९४ ला पाप झाले असे म्हणणारे स्वतः गेल्या २५-२६ वर्षांपासून सातत्याने सत्तेतच बसलेले आहेत, मग त्यांनी आतापर्यंत काय केले?” असा टोला त्यांनी लगावला.
हेही वाचा…
LIVE मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 6 वा दिवस: बीडच्या आंदोलकाचा हृदयविकाराने मृत्यू; धाराशिव अन् परभणी जिल्ह्यात कडकडीत ‘बंद’

सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासह विविध मागण्यांसाठी आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून मराठा बांधव आंतरवाली सराटीत दाखल होत असतानाच, गुरुवारी एक दुर्दैवी घटना घडली. जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या बीड जिल्ह्यातील एका मराठा आंदोलकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. येथे वाचा संपूर्ण बातमी