Headlines

दक्षिण गडचिरोलीत भूकंपाचा सौम्य धक्का:अहेरी-सिरोंचा परिसरात 3.6 रिश्टर तीव्रता; 5 वर्षांतील 5 वा भूकंप




दक्षिण गडचिरोली शहरासह परिसराला गुरुवारी पहाटे भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या माहितीनुसार, 3 सप्टेंबर रोजी पहाटे 4 वाजून 36 मिनिटे 58 सेकंदांनी 3.6 रिश्टर तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. या भूकंपाचा केंद्रबिंदू सिरोंचा तालुक्यातील राखीव वनक्षेत्र परिसरात होता. तो जमिनीपासून अवघ्या 10 किलोमीटर खोलीवर (19.103 अंश उत्तर अक्षांश व 79.929 अंश पूर्व रेखांश) होता. हे ठिकाण तेलंगणातील करीमनगरच्या ईशान्येस सुमारे 112 किलोमीटर अंतरावर आहे. पहाटेच्या सुमारास जमीन हादरल्याने अहेरी, नागेपल्ली आणि सिरोंचा परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण होते. प्राथमिक माहितीनुसार, या घटनेत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी नागरिकांना घाबरून न जाता सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. दक्षिण गडचिरोलीत गेल्या पाच वर्षांतील हा पाचवा भूकंप आहे. त्यामुळे या भागातील भूगर्भीय हालचालींचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. यापूर्वी फेब्रुवारी 2026 मध्ये अहेरी, आलापल्ली आणि सिरोंचा परिसरात 3.9 रिश्टर तीव्रतेचा धक्का जाणवला होता. त्याआधी 29 ऑक्टोबर 2022 रोजी 3.8 रिश्टर आणि 31 ऑक्टोबर 2021 रोजी 4.3 रिश्टर तीव्रतेचे धक्के या भागात झाले होते. केवळ गडचिरोलीच नाही, तर नागपूर विभागातही भूकंपाचे धक्के नोंदवले गेले आहेत. 25 मे 2023 रोजी वर्ध्यात 4.8 रिश्टर, 25 जानेवारी 2023 रोजी चंद्रपूर-वर्धा सीमाभागात 3.9 रिश्टर, तर ऑक्टोबर 2020 मध्ये नागपूर जिल्ह्यात 4.0 रिश्टर तीव्रतेचे भूकंप झाले होते. या वारंवार होणाऱ्या भूकंपांमागे काही शास्त्रीय आणि भूगर्भीय कारणे आहेत. हा संपूर्ण परिसर भूगर्भीयदृष्ट्या प्राचीन असलेल्या ‘प्राणहिता-गोदावरी खोऱ्यात’ (Pranhita-Godavari Graben) आहे. येथे अनेक सुप्त भ्रंश रेषा (Fault Lines) आहेत. भारतीय भूपट्टाच्या उत्तरेकडील सरकण्यामुळे भूगर्भात साचलेला ताण या जुन्या भ्रंश रेषांवरून मोकळा होतो. याला शास्त्रीय भाषेत ‘इंटरप्लेट टेक्टॉनिक स्ट्रेस’ म्हणतात. भूकंपाची खोली जमिनीपासून अवघ्या 10 किलोमीटरवर असल्याने, कमी तीव्रतेचा धक्का असूनही कंपने स्पष्टपणे जाणवली.

याशिवाय, पावसाळ्यात नद्यांच्या पात्रातील पाण्याचा दाब वाढल्याने भूगर्भातील खडक घसरतात आणि सूक्ष्म हालचालींना गती मिळते. भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते, प्राणहिता-गोदावरी खोऱ्यात जाणवणारे हे धक्के ‘मायक्रो-सिस्मिसिटी’ (Micro-seismicity) सक्रिय असल्याचे दाखवतात. हा भाग सिस्मोनिक झोन-3 मध्ये येत असल्याने येथे खूप विनाशकारी भूकंपाची शक्यता कमी आहे. तरीही, वारंवार घडणाऱ्या या हालचालींचा सखोल अभ्यास करण्यासाठी राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने विशेष सिस्मोग्राफिक नेटवर्क उभारून भूगर्भीय निरीक्षणे नोंदवणे खूप महत्त्वाचे बनले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *