Headlines

विद्यानंद बापट यांना मारहाण करणारा गणेश मंडळाचा माजी अध्यक्ष गजाआड:पोलिस आयुक्तांचा कठोर कारवाईचा इशारा; आरोपीकडून मारहाणीचे समर्थन




पुण्यातील गणेशोत्सवात कर्णकर्कश डीजे, साऊंड सिस्टीम आणि ध्वनिप्रदूषणाविरोधात आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांना भररस्त्यात मारहाण करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. संतोष चव्हाण असे या आरोपीचे नाव असून, तो एका स्थानिक गणेश मंडळाचा माजी अध्यक्ष असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची गंभीर दखल घेत पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी कडक कारवाईचे निर्देश दिले असून, शहरात अशा प्रकारची गुंडगिरी खपवून घेतली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. कोण आहे आरोपी संतोष चव्हाण? संतोष चव्हाण हा पुण्यातील कोथरूड परिसरातील राऊतवाडी येथील रहिवासी आहे. तो एका स्थानिक बांधकाम व्यावसायिकाकडे नोकरीला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. राऊतवाडी येथील ‘प्रियदर्शनी गणेश मंडळा’चा तो माजी अध्यक्ष राहिला असून, स्वतःला कट्टर गणेशप्रेमी म्हणवून घेतो. मुलाखतीदरम्यान हल्ला अन् विकृत समर्थन टिळक रस्त्यावरील कशाळे चौकात विद्यानंद बापट एका वृत्तवाहिनीला थेट मुलाखत देत असताना संतोष चव्हाणने अचानक त्यांच्या अंगावर धावून जात त्यांना मारहाण केली. “तू आमच्या गणेशोत्सवाला विरोध का करतोस?” असा जाब विचारत त्याने हा हल्ला केला. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतरही त्याने केलेल्या कृत्याचा पश्चात्ताप न बाळगता, “बापट यांना केवळ गणेशोत्सवच दिसतो का? त्यांना अजून मारायला पाहिजे होते,” असे संतापजनक वक्तव्य करत हल्ल्याचे समर्थन केले. व्हिडिओतून केले होते डीजे व साऊंड सिस्टीमचे समर्थन हल्ल्यापूर्वी सोशल मीडियावर समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये आरोपी संतोष चव्हाणने डीजे आणि साऊंड सिस्टीमच्या बाजूने भूमिका मांडली होती. आरोपी म्हणाला, “पुण्यात सुमारे 4 हजार लहान-मोठी मंडळे असून उत्सवात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. 700 मंडळांनी जरी साऊंड सिस्टीम लावली नाही, तर जनरेटर, लाइट, ट्रॅक्टर-ट्रॉली, हमाल आणि साऊंड ऑपरेटर अशा 8 हजार कष्टकऱ्यांच्या घरातील चूल बंद पडेल.” “निवडणुका, प्रचार आणि कोविड संकटात मंडळांचे कार्यकर्ते धावून जातात; मात्र सणांवर बंधने येतात तेव्हा पुण्यातील लोकप्रतिनिधी मंडळांच्या बाजूने ठाम उभे राहत नाहीत. मर्यादा पाळून साऊंड सिस्टिम चालवण्यास परवानगी हवी,” असा युक्तिवाद त्याने मांडला होता. लक्ष्मणरेषा ओलांडणाऱ्यांवर कठोर कारवाई: पोलिस आयुक्त या घटनेनंतर पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. “विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ला अत्यंत निंदनीय आहे. लोकशाहीत प्रत्येकाला स्वतःचे मत मांडण्याचा घटनादत्त अधिकार आहे. कोणीही कायदा हातात घेऊन लक्ष्मणरेषा ओलांडल्यास त्याच्यावर अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.” “गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा; हिंसेचे समर्थन केले जाणार नाही. पोलिसांनी यंदा आवाजाच्या स्पर्धेला आळा घालण्यासाठी ४ बेस आणि ४ टॉपची मर्यादा घालून दिली असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर करडी नजर ठेवली जाईल.” दरम्यान, या हल्ल्यामागे केवळ डीजेविरोधातील भूमिकेचा राग होता की इतर कोणाची चिथावणी होती, याचा सखोल तपास विश्रामबाग पोलीस करत आहेत. डीजेविरोधातील बापटांची भूमिका काय? विद्यानंद बापट हे गणेशोत्सवाच्या विरोधात नसल्याचे त्यांनी यापूर्वी स्पष्ट केले आहे. त्यांचा विरोध गणेशोत्सवाला नसून मोठ्या आवाजातील डीजे, साऊंड सिस्टीम आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाला आहे. पुणे महापालिकेच्या गणेशोत्सवपूर्व बैठकीतही त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करताना इतर नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याची भूमिका त्यांनी मांडली होती. गणेश विसर्जनाच्या मिरवणुका, मोठ्या आवाजातील ध्वनिक्षेपक आणि डीजेमुळे होणारे ध्वनीप्रदूषण याबरोबरच मिरवणुकांमुळे प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक कोंडीचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला होता. त्यांच्या अस्खलित मराठीतील मांडणीमुळे त्यांचे वक्तव्य सोशल मीडियावर चर्चेत आले होते. ‘घटं भिन्द्यात्…’ श्लोकही झाला होता व्हायरल गणेशोत्सवाच्या बैठकीतील आपल्या भूमिकेमुळे बापट चर्चेत आले होते. त्यांनी संस्कृतमधील “घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् कुर्याद् गर्दभरौहणम्…” हा श्लोक सांगितला होता. त्याचा अर्थही त्यांनी स्पष्ट केला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि त्यावर अनेक रील्सही तयार करण्यात आल्या. त्यानंतर बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेची पुण्यात चर्चा सुरू झाली. आता त्याच बापट यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे गणेशोत्सवातील डीजेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. हेही वाचा… हल्ल्यानंतर विद्यानंद बापट यांची प्रतिक्रिया:मुद्द्याचे उत्तर गुद्द्याने द्यायचे नसते, झॉम्बीसोबत काय युक्तिवाद करणार? पुन्हा ऐकवले सुभाषित पुण्यातील गणेशोत्सवात डीजे आणि कर्णकर्कश ध्वनिप्रदूषणाविरोधात भूमिका घेणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावर टिळक रस्त्यावरील कशाळे चौकात हल्ला झाल्यानंतरही ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. एका वृत्तवाहिनीला थेट मुलाखत देत असताना अचानक एका माथेफिरूने त्यांच्यावर हल्ला चढवला. उपस्थित नागरिक आणि पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप केल्यामुळे अनर्थ टळला. या हल्ल्यानंतर बापट जराही डगमगले नाहीत; उलट त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर अत्यंत शांतपणे व रोखठोख शब्दांत आपली भूमिका मांडली. येथे वाचा संपूर्ण बातमी पुण्यात डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापटांवर हल्ला: रोहित पवार, सुषमा अंधारेंकडून संताप व्यक्त, तातडीने पोलिस संरक्षणाची मागणी पुण्यातील गणेशोत्सवात डीजेच्या कर्णकर्कश आवाजाला आणि ध्वनिप्रदूषणाला जाहीर विरोध करून राज्यभरात चर्चेत आलेले पर्यावरणप्रेमी विद्यानंद बापट यांना टिळक रस्त्यावरील कशाळे चौकात बेदम मारहाण करण्यात आली आहे. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत असताना आणि नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत असताना अचानक आलेल्या 4 ते 5 तरुणांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. या घटनेमुळे पुणे शहरात मोठी खळबळ उडाली असून संताप व्यक्त केला जात आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *