![]()
नागपूर शहरात ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘नॉइझ फ्री नागपूर’ पोर्टल सुरू करण्यात आले आहे. नागपूर महानगरपालिका आणि नागपूर शहर पोलिस विभागाने संयुक्तपणे हे पोर्टल सुरू केले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्देशानुसार ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. यामुळे आता तक्रारींवर कारवाईचा कालावधी 3 तासांवरून थेट 30 मिनिटांवर आणण्यात आला आहे. नागरिकांना ध्वनी प्रदूषणाची तक्रार नोंदवण्यासाठी noisefreenagpur.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन ‘File a Complaint’ या पर्यायाचा वापर करता येईल. डीजे, लाऊडस्पीकर, वाहनांचे कर्कश हॉर्न, मोडिफाइड सायलेन्सर, बांधकाम, जनरेटर आणि फटाक्यांमुळे होणाऱ्या आवाजाविरुद्ध तक्रार दाखल करता येईल. या पोर्टलवर नागरिकांनी नोंदवलेली तक्रार थेट संबंधित पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांकडे पाठवली जाईल. जर 30 मिनिटांत कारवाई झाली नाही, तर ही तक्रार आपोआप वरिष्ठ पातळीवर, म्हणजे सहाय्यक पोलिस आयुक्त (ACP) आणि त्यानंतर पोलिस उपायुक्तांकडे (DCP) हस्तांतरित होईल. शहरातील 6 झोनमधील 35 पोलिस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात ही यंत्रणा 24 तास काम करेल. रात्री 10 ते सकाळी 6 या शांततेच्या कालावधीत नियमांचे उल्लंघन झाल्यास, नागरिकांना फोटो, व्हिडिओ, ऑडिओ तसेच ‘लाइव्ह डेसिबल मीटर’द्वारे ध्वनीपातळीचे पुरावे जोडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, तक्रारदाराची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवण्याचा पर्यायही येथे देण्यात आला आहे. गणेश मंडळांना नोटीस बजावणार आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन शहरातील सर्व गणेश मंडळांना ध्वनी प्रदूषणाच्या नियमांबाबत पूर्वसूचना व नोटिसा बजावणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर व ठरवून दिलेल्या डेसिबल मर्यादेपेक्षा जास्त आवाज करणाऱ्यांवर अत्यंत कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.
Source link
नागपूर आता होणार 'नॉइझ फ्री:मनपा अन् पोलिसांचा संयुक्त उपक्रम; तक्रारींवर अवघ्या 30 मिनिटांत होणार कारवाई