Headlines

एसटीच्या NCMC कार्डमुळे प्रवाशांच्या सवलती बंद; राज्यभरात गोंधळ:ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थ्यांसह इतरांना फटका; आंदोलनाचा इशारा




महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) १ सप्टेंबरपासून नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) लागू केले आहे. कोणतीही पूर्वकल्पना किंवा तयारी न करता हा निर्णय घेतल्याने अमरावतीसह राज्यभरात गोंधळ निर्माण झाला आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी, दिव्यांग आणि लहान मुलांना प्रवास दरात मिळणाऱ्या सवलती जवळपास बंद झाल्या आहेत. सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांनी हा निर्णय तात्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी अमरावतीच्या विभागीय नियंत्रकांमार्फत महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना निवेदन पाठवले आहे. एक सप्टेंबरपासून अचानक कार्ड सक्ती लागू झाल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची मोठी गैरसोय झाली. वाहकांकडे असलेल्या ई-टीआयएम मशिन्स अपडेट नाहीत. अनेक ठिकाणी नेटवर्क नसल्याने तिकिटेच निघत नाहीत. प्रवाशांकडे रोख रक्कम असतानाही वाहक पैसे घेण्यास नकार देत आहेत. इतकेच नाही, तर ज्या प्रवाशांकडे एनसीएमसी कार्ड आहे, त्यांचे रिचार्ज करतानाही सतत अडचणी येत आहेत. अनेकदा खात्यातून पैसे कापले जातात, पण तिकीट मात्र जनरेट होत नाही. यामुळे एसटी प्रवासात रोज वाहक आणि प्रवाशांमध्ये वाद होत आहेत. एसटी प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनामुळे महामंडळाची प्रतिमा खराब होत आहे. सवलतीचे तिकीट बंद झाल्यामुळे प्रवाशांना नाईलाजाने पूर्ण तिकीट काढावे लागत आहे. हा एकप्रकारे प्रवाशांच्या खिशावर दरोडाच असल्याचा आरोप कांबळे यांनी केला आहे. त्यामुळे तातडीने एनसीएमसी कार्डच्या अंमलबजावणीला स्थगिती द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसह सवलतीचा लाभ घेणाऱ्या सर्व प्रवाशांना घेऊन आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी शिरजगाव मोझरी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य पुरुषोत्तम मेश्राम, संदीप हगवणे, विशाल कांबळे आणि प्रशांत शेंडे उपस्थित होते. सध्याच्या अपडेट नसलेल्या मशिन्समध्ये महिला सन्मान योजनेअंतर्गत मिळणारी ५० टक्के सवलत, ज्येष्ठ नागरिकांना मिळणारा ५० ते १०० टक्के मोफत प्रवास, दिव्यांग, विद्यार्थी आणि लहान मुलांच्या सवलतीचे पर्यायच दिसत नाहीत. मशिन्समध्ये महिला सवलतीचे बटणच बंद करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *