![]()
साताऱ्यातील राजकारणाला पुन्हा एकदा ताप आला असून शिवसेना शिंदे गटातील कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत पक्षात खळबळ उडवली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रथमच जाहीर भूमिका घेतली. विशेष म्हणजे त्यांनी थेट पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर गंभीर आरोप करत आपल्याला कार्यक्रमांपासून जाणीवपूर्वक दूर ठेवले जात असल्याचा दावा केला. या विधानामुळे शिंदे गटातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. महेश शिंदे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, मला सुरुवातीपासूनच वेगळी वागणूक दिली जाते. कोणत्याही कार्यक्रमासाठी मला निमंत्रण दिले जात नाही. त्यांनी असेही सांगितले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सातारा दौऱ्याच्या कार्यक्रमासाठी त्यांना ना फोन आला ना अधिकृत आमंत्रण मिळाले. हा शिवसेनेचा पहिलाच कार्यक्रम नाही की मी जाणार नाही, पण मुख्यमंत्री झाल्यानंतर माझे फोटो बॅनरवर दिसत नाहीत, असे म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे स्थानिक नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याचबरोबर महेश शिंदे यांनी एक खळबळजनक सवाल उपस्थित केला. जिल्ह्यात शिवसैनिक आहेत तरी कुठे? असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित करत पक्षाच्या संघटनात्मक स्थितीवर बोट ठेवले. त्यांच्या या वक्तव्याने स्थानिक शिवसेना नेतृत्वावर अप्रत्यक्ष टीका झाली आहे. साताऱ्यातील कार्यकर्त्यांमध्ये असंतोष वाढत असल्याचे संकेतही या वक्तव्यातून मिळत आहेत. त्यामुळे हा वाद केवळ वैयक्तिक न राहता संघटनात्मक पातळीवर पोहोचण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या संदर्भात बोलताना महेश शिंदे यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, त्यांच्या पत्नी प्रिया शिंदे या शिवसेनेतून निवडून आल्या, मात्र त्या भाजपकडून अध्यक्ष झाल्या नाहीत. आम्ही सुरुवातीपासून भाजपसोबत काम करत आलो आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, पालकमंत्रीपदाची जबाबदारी पाच वर्षे असूनही पक्षाला अपेक्षित वाढ साधता आली नाही, असा आरोप करत त्यांनी शंभूराज देसाई यांच्यावर जोरदार टीका केली. महेश शिंदे यांची राजकीय कारकीर्दही चर्चेचा विषय ठरली आहे. त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेसमधून केली होती. त्यानंतर ते भाजपमध्ये गेले आणि पुढे कोरेगाव मतदारसंघ शिवसेनेला गेल्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान त्यांनी दोन सदस्यांना आपल्या बाजूला घेतल्यामुळे सत्तासमीकरण बदलले होते. शिवसेना-राष्ट्रवादीकडे बहुमत असतानाही भाजपचा अध्यक्ष निवडून येण्यात त्यांचा मोठा वाटा होता, असे मानले जाते. शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर या सर्व घडामोडींमुळे साताऱ्यातील शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. महेश शिंदे यांच्या विधानानंतर स्थानिक नेते काय प्रतिक्रिया देणार आणि पक्षश्रेष्ठी यावर कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी काळात हा वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, शिंदे गटासाठी ही परिस्थिती आव्हानात्मक ठरू शकते.
Source link
जिल्ह्यात शिवसैनिक आहेत कुठे?:महेश शिंदेंचा स्फोटक सवाल, शिंदे गटात खदखद उफाळली; साताऱ्यात शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर?