![]()
तांत्रिक बिघाड आणि विलंबाचे सत्र पाचवीला पूजलेल्या मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी सोमवारची सकाळ पुन्हा एकदा मनस्तापाची ठरली आहे. डोंबिवली स्थानकाजवळ रिकाम्या लोकल ट्रेनचा एक डबा रुळावरून घसरल्याने मुख्य मार्गावरील वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी, ऐन कामावर जाण्याच्या वेळी ही घटना घडल्याने रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळली असून वाहतूक पूर्वपदावर येण्यासाठी काही तासांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, एक लोकल ट्रेन कळवा कारशेडमधून कल्याणच्या दिशेने जात होती. ही ट्रेन प्रवाशांशिवाय रिकामी होती. सोमवारी सकाळी ही ट्रेन डोंबिवली स्थानकाच्या परिसरात आली असता, अचानक एका डब्याची चाके रुळावरून खाली घसरली. ट्रेन रिकामी असल्याने सुदैवाने यात कोणालाही दुखापत झालेली नाही, मात्र यामुळे रेल्वेच्या मुख्य लाईनचा मार्ग ब्लॉक झाला आहे.या अपघातामुळे मध्य रेल्वेच्या अप मार्गावर म्हणजेच मुंबईकडे जाणाऱ्या लोकलवकर मोठा परिणाम झाला आहे. प्रवाशांचा खोळंबा आणि संताप सकाळी ८ ते १० ही वेळ मुंबई आणि उपनगरातील चाकरमान्यांसाठी अत्यंत महत्त्वाची असते. याच वेळी डोंबिवलीत डबा घसरल्याने सध्या अप मार्गावरील ३ गाड्या जागीच थांबल्या आहेत. ज्यामुळे प्रवाशांना मोठा विलंब होत आहे. तसेच सध्या स्थानकांवर गर्दी पाहायला मिळत आहे. कल्याण, डोंबिवली, कोपर आणि ठाकुर्ली या स्थानकांवर लोकलच्या रांगा लागल्या आहेत. या घटनेमुळे कल्याणकडून मुंबईच्या दिशेने येणारी आणि मुंबईकडून कल्याणकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. अनेक प्रवाशांनी लोकलमध्ये अडकून पडण्यापेक्षा रुळांवरून चालत जवळचे स्थानक गाठणे पसंत केले. रिक्षा आणि बस थांब्यांवरही प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. डबा पुन्हा रुळावर आणण्याचे प्रयत्न सुरू घटनेची माहिती मिळताच मध्य रेल्वेचे तांत्रिक पथक आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे. रुळावरून घसरलेला डबा पुन्हा रुळावर आणण्याचे (Re-railing) काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, तोपर्यंत पुढील काही तास मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने धावणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सध्या घसरलेला डबा पुन्हा रुळावर आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. शक्य तितक्या लवकर वाहतूक पूर्ववत करण्याचे आश्वासन रेल्वेने दिले आहे.
Source link
ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेचा बोजवारा:डोंबिवलीत लोकलचा डबा रुळावरून घसरला; वाहतूक विस्कळीत, चाकरमान्यांचे प्रचंड हाल