Headlines

पुनीत बालन ग्रुपची डीजेमुक्त दहीहंडी:लाल महाल चौकात सार्वजनिक गणेश मंडळांचा सहभाग, पारंपरिक वाद्यांचा गजर




पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना एकत्र आणत पुनीत बालन ग्रुपने यंदाही डीजेमुक्त दहीहंडी सोहळ्याचे आयोजन केले आहे. पारंपरिक वाद्ये, ढोल-ताशे, हलगी-मर्दानी खेळ आणि विविध सांस्कृतिक सादरीकरणांच्या माध्यमातून हा उत्सव साजरा होणार आहे, अशी माहिती ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील ऐतिहासिक लाल महाल चौकात हा संयुक्त दहीहंडी सोहळा रंगणार आहे. पुनीत बालन ग्रुपने दोन वर्षांपासून संयुक्त दहीहंडी उत्सव सुरू केला आहे. गेल्या वर्षी त्यांनी महाराष्ट्रातील पहिली सार्वजनिक डीजेमुक्त दहीहंडी साजरी केली होती. त्यानंतर डीजेमुक्त दहीहंडी आणि गणेशोत्सव साजरा करण्याची भूमिका ग्रुपने सातत्याने घेतली आहे. या उपक्रमाला यंदा चांगला प्रतिसाद मिळत असून, यावर्षी तब्बल ३१ गणेश मंडळे या संयुक्त दहीहंडीत सहभागी होणार आहेत. या संयुक्त दहीहंडी कार्यक्रमाची सुरुवात दुपारी तीन वाजता प्रभात बँडच्या वादनाने होईल. त्यानंतर मानवंदना दिली जाईल. या कार्यक्रमानंतर रमणबाग तेजस्विनी, पकवाज टाळ, शिवाद्य, गजर, हलगी वादन, मर्दानी खेळ, आवर्तन, समर्थ, शिवमुद्रा आणि अष्टविनायक या पथकांचे सादरीकरण होणार आहे. पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन म्हणाले, ‘दहीहंडी आणि गणेशोत्सव हे आपल्या संस्कृतीचा आणि परंपरेचा भाग आहेत. या उत्सवांचा आनंद मोठ्या आवाजाच्या डीजेऐवजी पारंपरिक वाद्ये, ढोल-ताशे, हलगी, मर्दानी खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातूनही तितक्याच उत्साहाने घेता येतो.’ ‘गेल्या वर्षी सुरू केलेल्या डीजेमुक्त दहीहंडीच्या उपक्रमाला यंदा मोठा प्रतिसाद मिळत आहे. दोनशेहून अधिक गणेश मंडळांनी डीजे न लावण्याचा घेतलेला निर्णय ही सकारात्मक आणि स्वागतार्ह बाब आहे. पुढील काळात पुण्यातील उत्सव अधिक पारंपरिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे व्हावेत, हा आमचा प्रयत्न आहे,’ असेही बालन यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *