.


शिक्षण क्षेत्रात २५ वर्षांची प्रदीर्घ सेवा बजावत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने झटणारे शिक्षक नितीन धोरण यांनी आपल्या कल्पक कार्यातून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अकोट पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा, लोहारी खुर्द येथे कार्यरत असलेल्या धोरण यांनी अवघ्या एका वर्षाच्या कालावधीत शाळेचे रूप पालटून टाकले आहे.
धोरण यांनी पुढाकार घेत स्वखर्चाने शाळेची रंगरंगोटी केली आणि आवारात सुंदर परसबाग फुलवली. याशिवाय गावच्या सरपंच पूजा म्हैसने यांच्या सहकार्याने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे, सोलर पॅनल, रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि पेव्हर ब्लॉक आदी आधुनिक भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्यांच्या या प्रयत्नांमुळे ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ उपक्रमात शाळेने भरीव कामगिरी करत ग्रामपंचायतीला तालुका व जिल्हास्तरावर बक्षिसे मिळवून देत थेट विभाग स्तरापर्यंत पोहोचवण्यात वाटा उचलला. तसेच ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानातही शाळेने उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
नितीन धोरण यांनी सहकारी शिक्षिका सोनाली उज्जैनकर, सोनाली निचळ आणि रुपाली ढवळे यांच्या साथीने केवळ भौतिक सुविधांवर भर न देता मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी पावले उचलली आहेत. अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, आत्मविश्वास आणि सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी ते विशेष प्रयत्नशील असतात. क्षेत्रभेट, शैक्षणिक सहल, कार्यानुभव अंतर्गत वस्तू बनवणे आणि विविध स्पर्धांच्या माध्यमातून त्यांनी शाळेत आनंददायी व गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे वातावरण निर्माण केले आहे. यापूर्वी त्यांनी रोहनखेड, बांबर्डा आणि मनब्दा येथे कार्यरत असतानाही समाजोपयोगी कार्य केले. गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासाठी कायम ठेव देणे, बोर्डी शाळेच्या बाल-वाचनालयासाठी १४ हजार रुपयांची पुस्तके भेट देणे, अशा उपक्रमांतून त्यांची दातृत्वाची भावना दिसून येते. मनब्दा येथे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांना तहसीलदारांच्या हस्ते गौरवण्यात आले आहे.
सामाजिक बांधिलकी धोरण हे केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न राहता सामाजिक कार्यातही अग्रभागी असतात. रोहनखेड व बांबर्डा येथील गरजू विद्यार्थ्यांसाठी ठेवलेली कायम ठेव असो किंवा बोर्डीच्या अभिनव वाचनालयासाठी दिलेली पुस्तकांची देणगी असो, त्यांची दातृत्ववृत्ती सातत्याने दिसून आली आहे. २० हून अधिक वेळा केलेले रक्तदान, उत्कृष्ट बीएलओ पुरस्कार यातून आदर्श ठेवला आहे.
सहकार्यातून बदल ^सुरुवात स्वतःपासून केली, तर परिवर्तन निश्चित घडते. विद्यार्थ्यांना सर्व आधुनिक सुविधा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, हाच ध्यास आहे. सहकारी शिक्षिका व ग्रामस्थांच्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले. – नितीन धोरण, शिक्षक, जि. प. शाळा, लोहारी खुर्द.