Headlines

यवतमाळ हादरले:मानलेल्या बहिणीशी बोलल्याच्या रागातून मित्राचाच खून, दोन्ही अल्पवयीन मारेकरी पोलिसांच्या ताब्यात‎




मानलेल्या बहिणीशी मोबाईलवर संवाद साधत असल्याच्या रागातून दोन अल्पवयीन मित्रांनीच एका 18 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने भोसकून निर्घृण हत्या केली. ही धक्कादायक घटना शनिवारी मध्यरात्री पिंपळगाव परिसरातील बोबडे ले-आऊटमध्ये घडली. रोहित वीरेंद्र मेश्राम (वय 18, रा. बोबडे ले-आऊट, यवतमाळ) असे मृत तरुणाचे नाव असून, या प्रकरणी लोहारा पोलिसांनी दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले आहे. दिलेल्या माहितीनुसार, मृत रोहित मेश्राम याची एक मैत्रीण होती. मात्र, आरोपींपैकी एक अल्पवयीन मुलगा त्या मुलीला आपली मानलेली बहीण मानत होता. रोहित आणि ती मुलगी मोबाईलवर सतत बोलत असल्यामुळे आरोपीच्या मनात राग निर्माण झाला होता. माझ्या मानलेल्या बहिणीशी बोलू नको, या कारणावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. दोन दिवसांपूर्वीही याच विषयावरून त्यांच्यात खटके उडाले होते. याच वादाचा वचपा काढण्यासाठी दोन्ही अल्पवयीन मित्रांनी रोहितच्या हत्येचा कट रचला. शनिवारी मध्यरात्री आरोपींनी रोहितला मोबाईलवर संपर्क साधून घराबाहेर बोलावले. मित्रांचा फोन आल्यामुळे रोहित घराबाहेर पडला. घरापासून थोड्या अंतरावर तिघेही बोलत असताना पुन्हा वाद पेटला. संतापलेल्या आरोपींनी लगेच चाकू काढून रोहितच्या पोटावर वार केले. गंभीर दुखापत झाल्यामुळे रोहितचा जागीच मृत्यू झाला. वडिलांनी शोध घेतला अन्… मुलगा रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने रोहितच्या वडिलांनी त्याचा शोध सुरू केला. घरापासून काही अंतरावरच रोहित रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर पडलेला त्यांना दिसला. त्यांनी तात्काळ ‘112’ क्रमांकावर कॉल करून पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच लोहारा ठाण्याचे पोलिस निरीक्षक रोहित चौधरी व उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल काळे यांनी घटनेच्या ठिकाणी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी आकाश विजय ओंकार यांनी दिलेल्या तक्रारीवरून लोहारा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पश्चात्ताप झाला अन् आरोपी स्वतः ठाण्यात पोहोचले मृत रोहित मेश्राम पूर्वी पाटीपुरा परिसरात राहत होता, त्यानंतर तो कुटुंबासह पिंपळगाव येथील बोबडे ले-आऊटमधील एका अपार्टमेंटमध्ये राहण्यास आला. तिथे त्याची या मुलांशी मैत्री झाली होती. हे तिघेही कायम एकत्र असायचे. मात्र, क्षुल्लक कारणावरून या मैत्रीचा अत्यंत दुर्दैवी शेवट झाला. रागाच्या भरात मित्राची हत्या केल्यानंतर आरोपींना पश्चात्ताप झाला आणि त्यांनी स्वतः लोहारा पोलिस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली. पालकांसाठी धोक्याची घंटा मुलांच्या हातात मोबाईल देताना त्यांच्या मानसिक स्थितीचा आणि मित्रपरिवाराचा विचार करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. मुलांचा ‘ईगो’ कुठे दुखावला जातोय किंवा त्यांच्यातील राग हिंसक रूप तर घेत नाही ना, याकडे वेळेत लक्ष दिले नाही तर एका क्षणाचा संताप दोन कुटुंबांचे आयुष्य कायमचे उद्ध्वस्त करू शकतो. संस्कार व संवादाचा अभाव मानलेल्या बहिणीशी बोलण्याच्या कारणावरून थेट मित्राचा खून करण्यापर्यंत अल्पवयीन मुलांची मजल जाणे अत्यंत चिंताजनक आहे. तरुण पिढीत रागावरील नियंत्रणाचा अभाव, नात्यांमधील गुंतागुंत आणि त्यातून निर्माण होणारा टोकाचा संताप यामुळे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असल्याचे स्पष्ट होते. एका क्षणाच्या रागात एका तरुणाला जीव गमवावा लागला, तर दुसरीकडे दोन अल्पवयीन मुलांचे भविष्य अंधकारमय झाले. संस्कार आणि संवादाअभावी कोवळ्या वयात घडणारी ही गुन्हेगारी समाजासाठी धोक्याची घंटा आहे. यवतमाळ जिल्ह्यात या वर्षात तब्बल 48 खून यवतमाळ जिल्ह्यात गंभीर गुन्ह्यांची मालिका सुरूच असून, या वर्षात आतापर्यंत तब्बल 48 खुनाच्या घटना घडल्याचे समोर आले आहे. एकापाठोपाठ एक घडणाऱ्या अशा घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. बहुतांश घटनांमागे जुने वैमनस्य, अनैतिक संबंध आणि आर्थिक व्यवहारांसह वाद व ईगो यांसारखी क्षुल्लक कारणे समोर आली आहेत. 48 पैकी अनेक गुन्ह्यांमध्ये 18 ते 25 वयोगटातील तरुणांसह अल्पवयीन मुलांचा सहभाग आढळल्याने पालकांची चिंता वाढली आहे. तसेच, अवैध शस्त्रांची सुलभ उपलब्धता हादेखील चिंतेचा विषय ठरत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *