राज्यात नीट पेपरफुटी प्रकरणानंतर एमपीएससी पेपरफुटी प्रकरण उघडकीस आल्यानंतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी एकजूट होत पुण्यात काल (दि. 8 सप्टेंबर) रोजी मोठा मोर्चा काढला होता. या मोर्चात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहि
.
रोहित पवारांनी ट्विट करत म्हटले की, MPSC आयोगाचे अध्यक्षपद म्हणजे अत्यंत महत्त्वाचे आणि संवैधानिक पद आहे, या पदावर बसणाऱ्या व्यक्तीसंदर्भात पुरावे काय तर साधा आरोप सुद्धा झालेला नसावा. भीमनवार साहेबांच्या कार्यकाळात झालेल्या ऐतिहासिक अशा पेपरफुटीवर विद्यार्थी राजीनामा मागत असताना नैतिकता दाखवत त्यांनी राजीनामा देणे अपेक्षित आहे, पण दुर्दैवाने ती नैतिकता त्यांच्याकडे दिसत नाही, असा टीका पवारांनी केली आहे.
तसेच पुढे रोहित पवार म्हणाले, पुरावे दिले तर क्षणाचाही विलंब न करता राजीनामा देईल, असे भीमनवार साहेब म्हणाले होते. परिवहन आयुक्त असताना भीमनवार साहेबांनी कशाप्रकारे भ्रष्टाचार केला यासंदर्भात त्यांच्याच विभागातील कनिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारी आणि पुरावे बघा, असे म्हणत त्यांनी तक्रारी दाखल केल्याचे कागदपत्रांचे फोटो शेअर केले आहेत.
हा फक्त ट्रेलर आहे, पूर्ण पिक्चर लवकरच दाखवतो.. बदल्या, पदोन्नती, ओव्हरलोड गाड्यांच्या लिस्ट, वरळी वाहनखरेदी प्रकरणी लाचलुचपत विभागाने केलेली चौकशी…… आणखी खूप काही आहे, असे म्हणत रोहित पवारांनी विवेक भीमनवार यांना इशारा दिला आहे.
सर्व परीक्षांची सखोल चौकशी करावी
दरम्यान, पुण्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे देखील आज एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. यावर भाष्य करताना रोहित पवार म्हणाले, काल पुण्यात दिसली तशीच MPSC च्या विद्यार्थ्यांची एकजूट आज छत्रपती संभाजीनगरमध्येही दिसत असून विद्यार्थ्यांच्या या मागण्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे. आतातरी सरकारने MPSC चे अध्यक्ष आणि सचिवांना पदावरून हटवावे आणि पेपरफुटीप्रकरणात अटक झालेल्या आरोपींच्या कार्यकाळात झालेल्या सर्व परीक्षांची सखोल चौकशी करावी. अन्यथा आज दिसत असलेला विद्यार्थ्यांचा आक्रोश हळूहळू रोषात रुपांतरीत होईल आणि ते सरकारला परवडणार नाही. त्यामुळे सरकारने एमपीएससीच्या परीक्षेत भ्रष्टाचाराची भेसळ करणाऱ्यांना तातडीने खड्यासारखं बाजूला सारून तिथे स्वच्छ प्रतिमेच्या अधिकाऱ्याची नेमणूक करावी आणि त्यांच्या इतरही मागण्यांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे.
मुलांच्या आक्रोशालाही नौटंकी म्हणणार का?
पुढे रोहित पवार म्हणाले, महत्त्वाचे म्हणजे राज्यात ठिकठिकाणी विद्यार्थ्यांचे असे विराट मोर्चे निघत आहेत. आता लिहून दिलेला मजकूर कॉपी करुन ट्विट करणारे भाजपाचे नेते आणि 40 पैसे कमेंटवर पोट भरणारे बाजारू मोर्चातील या सामान्य परिवारातील मुलांच्या आक्रोशालाही नौटंकी म्हणणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
रोहित पवार म्हणाले, मी कालच बोलताना स्पष्ट केलं की, विद्यार्थ्यांचा हा आक्रोश पुण्यापुरता मर्यादित राहणार नाही तर प्रत्येक जिल्ह्यात तो दिसेल आणि आज लगेचच तो छत्रपती संभाजीनगरमध्ये दिसला. सरकारने तरीही दुर्लक्ष केले तर हा आक्रोश थांबेल असे नाही तर यापुढे तो प्रत्येक जिल्ह्यात दिसल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.