Headlines

तुळशीबाग मंडळाने ढोलपथकाचा खर्च वाचवला:त्या निधीतून 6 विद्यार्थ्यांची फी भरून दिला सामाजिक संदेश




गणेशोत्सवातील पारंपरिक जल्लोषाला सामाजिक बांधिलकीची जोड देत श्री गजानन मंडळ ट्रस्ट, तुळशीबाग यांनी यंदाच्या उत्सवाची सुरुवात एका वेगळ्या संकल्पनेने केली आहे. ढोलपथक आणि इतर खर्च कमी करून त्या निधीतून नु.म.वि. प्रशालेतील ६ विद्यार्थ्यांचे वार्षिक शुल्क भरले. मंडळाने ‘उत्सवातून समाजासाठी काहीतरी’ देण्याचा संदेश दिला आहे. मंडळाचे अध्यक्ष सागर सुनील दहीभाते यांनी ही माहिती दिली. शालेय शुल्क देताना आमदार हेमंत रासने, राघवेंद्र मानकर, सागर सुनील दहीभाते, कुणाल टिळक, प्रशांत यादव हे उपस्थित होते. यंदा मंडळाचे ६१ वे वर्ष असून, यानिमित्ताने भव्य गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. विश्रामबागवाड्यासमोरून तुळशीबागेत जाणाऱ्या गल्लीच्या सुरुवातीला हे मंडळ आहे. सजावटीचे काम अंतिम टप्प्यात आहे. उत्सवाची सुरुवात सामाजिक उपक्रमाने करणाऱ्या मंडळाने पर्यावरण संवर्धनाचाही मार्ग स्वीकारला आहे. परिसरातील व्यापाऱ्यांना प्लास्टिकच्या ग्लासातून चहा न पिण्याचा केवळ सल्ला दिला नाही, तर त्यांना स्टीलचे ग्लास दिले. प्लास्टिकचा वाढता वापर आणि त्यातून होणारे पर्यावरण व आरोग्याचे प्रश्न लक्षात घेऊन हा उपक्रम राबवला. तुळशीबागसारख्या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यंदाही भाविकांना आणि पारंपरिक व्यावसायिकांना कोणताही त्रास न होता मंडप उभारण्यात आला आहे. यंदा ‘पुणे परिवार’ने मंडळाचे अध्यक्ष सागर सुनील दहीभाते यांना ‘आदर्श गणेशोत्सव कार्यकर्ता’ पुरस्कार दिला. श्री गजानन मित्र मंडळ ट्रस्ट, तुळशीबाग ‘गिरीकंधरा’ हा भव्य ४० फूट उंच देखावा सादर करणार आहे. या देखाव्याचे मुख्य आकर्षण ११ फुटांचे ध्यानस्थ हनुमानाचे हवेत तरंगणारे रूप असेल. आधुनिक तंत्रज्ञानाने साकारलेला हा अनुभव भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरेल. पर्वताच्या आत प्रवेश केल्यावर अद्भुत विश्व, रामायणकालीन प्रसंग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा अनोखा मेळ या देखाव्यात दिसेल. यानिमित्ताने १ ते ५ वर्षे वयोगटातील पाच हजार बालभक्तांना ‘हनुमान अस्त्र’ म्हणून गदा वाटप केले जाईल. हनुमानाच्या शौर्य, भक्ती आणि संस्कारांची ओळख मुलांना व्हावी, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *