![]()
नागपुरात विश्व हिंदू परिषदेच्या (विहिंप) शोभायात्रेत डीजे बंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी बजावलेल्या नोटीस आणि दाखल केलेल्या गुन्ह्यांवरून नवा वाद निर्माण झाला आहे. या कारवाईमुळे विहिंप आक्रमक झाली आहे. विहिंपने पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे की, सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवांमध्ये डीजे आणि लेझर लाईट्सचा सर्रास वापर झाला, तरी त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. मात्र, केवळ हिंदू संघटनांच्या धार्मिक मिरवणुकांवरच हेतुपुरस्सर कारवाई केली जात आहे. पत्रकार परिषदेत विहिंपचे महानगर मंत्री अमोल ठाकरे यांनी सांगितले की, स्थापना दिनानिमित्त सीताबर्डी परिसरातून शांततेत जात असलेल्या शोभायात्रेला रोखण्यासाठी सीताबर्डीच्या सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) अन्नपूर्णा सिंग यांनी अधिकृत डेसिबल मोजण्याचे यंत्र वापरले नाही. त्यांनी मोबाईलवरून डीजेचा आवाज मोजण्याचा प्रयत्न केला. यावेळी वाहनांच्या चाव्या काढून घेत कार्यकर्त्यांशी वाद घालण्यात आला. सत्ताधाऱ्यांचे कार्यक्रम असतात, तेव्हा पोलीस शांत बसतात. मग केवळ धार्मिक शोभायात्रांवरच डीजे बंदीच्या उल्लंघनाची कारवाई का केली जाते, असा सवाल ठाकरे यांनी विचारला. विहिंपने असाही आरोप केला आहे की, या कारवाईमागे सहाय्यक पोलीस आयुक्तांचा वैयक्तिक राग आहे. वाठोडा भागात काम करत असताना बजरंग दलाने गोवंश हत्या प्रकरण उघडकीस आणले होते. त्यानंतर त्यांची बदली झाली होती. त्याच रागातून ही कारवाई करण्यात आल्याचा दावा विहिंपने केला. डीजेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे कारण देत पोलिसांनी थेट देखाव्याच्या कारागीरांनाही नोटीस पाठवली आहे. या दुटप्पी कारवाईविरोधात पोलीस आयुक्तांची भेट घेऊन वस्तुस्थिती मांडली जाईल, असे विहिंपने सांगितले. पक्षपातीपणे काम करणाऱ्या एसीपी अन्नपूर्णा सिंग यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी, तसेच डीजे बंदी उल्लंघनाचे गुन्हे आणि नोटीस मागे घ्याव्यात, अशी मागणी विहिंपने केली आहे. जर या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर नागपुरात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. या पत्रकार परिषदेला विहिंपचे डॉ. हेमंत जांभेकर, प्रशांत तितरे, निरंजन रिसालदार, राजू पवनारकर आणि बजरंग दलाचे शुभम अरखेल उपस्थित होते.
Source link
नागपुरात डीजे बंदीच्या कारवाईवरून विहिंप आक्रमक:बंदी उल्लंघनाचे गुन्हे व नोटीस मागे घेण्याची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा