![]()
लेक मी संतांची, गाव चोरला ग बाई, करावं याला कांही बाई उपाय होत नाही, बया तुला बुरगंडा होईल गं.. ‘नाथाच्या घरची उलटी खूण, अन पाण्याला मोठी लागली तहान,’ ढवाळ लागलंय गड्याला..
.
याचा म्हातारा गरवार झाला..’करू नका गर्भात खून हो, उद्या मिळणार नाही तुम्हा सून हो..’ आज एक नवल देखिले रे भाई… मुंगीने हत्ती संगे केली लढाई.., खऱ्याचं झालंय खोटं..अन् गड्याला आलंय पोट..
या सारखी भारुडे म्हणत आई-वडिलांची सेवा करा, स्वार्थासोबतच परमार्थ ही करणे गरजेचे आहे,व्यसनाच्या आहारी जाऊ नका, प्रत्येकाने आपल्या अंगात एक तरी कला जोपासणे गरजेचे आहे. कलेशिवाय जगात जगणे अवघड आहे,तरुणांच्या विवाहाची वाढती समस्या, पावसाचा, हवामानाचा वाढत चाललेला लहरीपणा, स्त्रीभ्रूण हत्या, शेतातील वाढते यांत्रिकीकरण, ऊस गाळपास गेल्यावर कारखानादारांकडून होत असलेली काटेमारी,वाढते मोबाईल व्यसन, बदलते राजकारण, बाजारात शेतीमालाला मिळणारा दर,यावर भारुडकारांनी विडंबनात्मक पद्धतीने फटकारे मारत आपली भारुडे सादर करत ग्रामस्थांची मनोरंजनातून जागृती केली.कांही भारुडकारांनी बुरगुंडा, म्हातारा, दादला, स्त्री पात्राचे सोंग घेत पाच साडी बदलत, डोक्यावर पेटती समई व हातावर पेटता दिवा धरत नृत्य करत आपली भारुडे सादर करत ग्रामस्थांना खळखळून हसवत वाहवा मिळवली. पापरी (ता.मोहोळ) येथे पापरी ग्रामस्थांच्या वतीने शुक्रवारी श्रावण मासानिमित्त हनुमान मंदिरासमोर, दिंडी व भारुड सोहळ्याचे आयोजन केले होते.पापरी येथे गेल्या ८५ हून अधिक वर्षापासून ग्रामस्थांच्या वतीने भारुडांचा कार्यक्रम आयोजित केला जातो आहे. पूर्वी फक्त वयोवृद्ध जाणकारच या कार्यक्रमाचा आस्वाद घेत होते. मात्र अलीकडील काळात युवक वर्गही मोठ्या प्रमाणावर हजेरी लावून भारुड पाहू व त्यास आर्थिक योगदान देऊ लागले असल्याचे दिसून येत आहे.
नातीगोती, व्यवसायाबरोबरच सामाजिक संदर्भावर भाष्य लोकशिक्षणासाठी संत एकनाथांनी भारूडांची रचना केलेली असून, भारूडातील विषय हे सर्वसामान्यांच्या परिचयाचे व नित्याच्या व्यवहारात आढळणारे असतात. भावनेवर आरूढ होऊन लोकांचे प्रबोधन करण्याची कला म्हणजे भारूड, व्यवसाय, नातीगोती, सामाजिक सर्वसामान्यांच्या नित्याच्या व्यवहारातील प्रश्न,वृत्तिदर्शन, गाव, दैवी भूमिका, पशु-पक्षी,सण असे विविध विषय एकनाथांच्या भारुडांत दिसून येतात. भारूड कला ही अलीकडील काळात लोप पावत चालली आहे, भारूडकारही ग्रामीण मोजकेच राहिले आहेत. नव्या पिढीला विविध विषयाच्या माध्यमातून जागृत करण्याचे काम भारूडाच्या माध्यमातून भारूडकारांनी केले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्योने उपस्थित होते. त्यांनी भारूडाला दाद देत रोख बक्षिसे देऊन भारूडकारांना प्रोत्साहन दिले. महिला, तरुणांचीही मोठी गर्दी होती.