![]()
पावसाने पाठ फिरवल्याने मराठवाड्यातील खरीप हंगाम संकटात सापडला असून, आता या परिस्थितीची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली आहे. मराठवाड्यात निर्माण झालेली परिस्थिती कोरड्या दुष्काळासारखी असल्याचे सांगत मुंडे यांनी मराठवाड्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी आणि छत्रपती संभाजीनगर येथे विशेष मंत्रिमंडळ बैठक घ्यावी, अशी मागणी केली आहे. धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना यासंदर्भात पत्र पाठवले आहे. आगामी 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे शासकीय कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्याच ठिकाणी मंत्रिमंडळाची विशेष बैठक घेऊन मराठवाड्यातील दुष्काळसदृश परिस्थितीवर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. दुसरीकडे, मुंडेंच्या या पत्रावर अंबादास दानवे यांनी कडाडून टीका केली आहे. पावसाअभावी खरीप पिके धोक्यात धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात मराठवाड्यातील पावसाची स्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचे नमूद केले आहे. संपूर्ण खरीप हंगामात पावसाने सातत्याने ताण दिल्यामुळे बीडसह मराठवाड्यातील जवळपास सर्वच खरीप पिके करपू लागली आहेत. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडल्याचे त्यांनी म्हटले आहे. अनेक शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी करण्यासाठी बँका, विविध पतपुरवठा संस्था तसेच खासगी सावकारांकडून कर्ज घेतले आहे. मात्र, पिकांच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावरच पाऊस गायब झाल्याने या शेतकऱ्यांसमोर कर्ज फेडण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. उत्पादनच हातात येण्याची शक्यता कमी झाल्याने शेतकऱ्यांचे संपूर्ण आर्थिक गणित कोलमडण्याची भीती मुंडे यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे केवळ पावसाची प्रतीक्षा करण्याऐवजी सरकारने परिस्थितीचे तातडीने मूल्यांकन करून मदतीचा निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. ‘कोरडा दुष्काळ जाहीर करून सवलती द्या’ मराठवाड्यातील सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने कोरडा दुष्काळ जाहीर करावा आणि त्यानुसार शेतकऱ्यांना विविध सवलती द्याव्यात, अशी धनंजय मुंडे यांची प्रमुख मागणी आहे. दुष्काळ जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांना मिळणाऱ्या विविध शासकीय सवलती आणि मदतीचा मार्ग मोकळा होऊ शकतो. खरीप पिकांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी आर्थिक मदत, आगामी रब्बी हंगामाचे नियोजन, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था यावर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, असे मुंडे यांनी पत्रात म्हटले आहे. तलाव, विहिरी कोरड्या पडण्याची चिंता मुंडे यांनी केवळ शेतीच्या नुकसानीकडेच लक्ष वेधलेले नाही, तर आगामी काळात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईच्या संकटाचाही इशारा दिला आहे. पावसाअभावी तलाव, विहिरी आणि इतर जलस्रोतांमधील पाणीसाठा कमी होत आहे. त्यामुळे सध्याच्या खरीप संकटानंतर पुढील काही दिवसांत पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी भूजल आणि स्थानिक जलस्रोतांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे पावसाने आणखी दडी मारल्यास प्रशासनासमोर टँकरने पाणीपुरवठा, चारा उपलब्ध करून देणे आणि इतर तातडीच्या उपाययोजना करण्याचे मोठे आव्हान उभे राहू शकते. 17 सप्टेंबरला विशेष मंत्रिमंडळ बैठकीची मागणी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने 17 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर येथे ध्वजारोहणाचा शासकीय कार्यक्रम होणार आहे. याच पार्श्वभूमीवर त्याच दिवशी किंवा त्याच कालावधीत छत्रपती संभाजीनगर येथे मंत्रिमंडळाची विशेष बैठक घेण्यात यावी, अशी मागणी मुंडे यांनी केली आहे. या बैठकीत मराठवाड्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा सर्वंकष आढावा घेऊन मदतीचे पॅकेज जाहीर करावे, अशी त्यांची अपेक्षा आहे. मुंडे यांनी पत्रात यापूर्वीच्या उदाहरणांचाही संदर्भ दिला आहे. मराठवाडा जेव्हा जेव्हा गंभीर संकटात सापडला, तेव्हा राज्य सरकारने छत्रपती संभाजीनगर येथे विशेष मंत्रिमंडळ बैठका घेऊन या विभागासाठी विविध निर्णय आणि मदतीची पॅकेज जाहीर केली आहेत, असे त्यांनी नमूद केले आहे. त्यामुळे यंदाही त्याच पद्धतीने तातडीने बैठक घेऊन मराठवाड्याला दिलासा देण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. रब्बी हंगामासाठीही आतापासून नियोजनाची मागणी सध्याचा प्रश्न केवळ खरीप हंगामापुरता मर्यादित नसल्याचे मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. खरीप पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असताना आगामी रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना आधार देणे आवश्यक आहे. पाणीसाठ्याची उपलब्धता लक्षात घेऊन रब्बीच्या पिकांचे नियोजन, बियाणे आणि इतर आवश्यक बाबींमध्ये शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज आहे. त्यामुळे सरकारने आत्तापासूनच रब्बी हंगामासाठी नियोजन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रासाठीही स्वतंत्र बैठक धनंजय मुंडे यांनी केवळ मराठवाड्यापुरतीच मागणी मर्यादित ठेवलेली नाही. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांतही पावसाअभावी पिकांची परिस्थिती बिकट झाली आहे, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. या भागातील शेतकऱ्यांनाही पावसाच्या तुटीचा फटका बसत असल्याने मराठवाड्यापाठोपाठ विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रासाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ बैठका घेऊन परिस्थितीचा आढावा घ्यावा आणि आवश्यक मदतीचे निर्णय घ्यावेत, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. निव्वळ प्रसिद्धीचा प्रयत्न; धनंजय मुंडेंच्या पत्रावर अंबादास दानवेंचा हल्लाबोल मुंडेंच्या या मागणीवर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी जोरदार निशाणा साधला आहे. ‘धनंजय मुंडे दीर्घकाळ मंत्री राहिले आहेत. मंत्रिमंडळ बैठकीची प्रक्रिया त्यांना माहिती आहे. आठ दिवस अगोदर केवळ बैठक घेण्याची मागणी करणे म्हणजे निव्वळ औपचारिक पत्रलेखन आणि प्रसिद्धीचा प्रयत्न आहे,’ असा टोला दानवेंनी लगावला आहे. मराठवाड्यातील पत्रांना मुख्यमंत्री किती महत्त्व देतात, गावाला माहिती अंबादास दानवे यांनी समाजमाध्यमावरील आपल्या पोस्टमधून धनंजय मुंडे यांच्या पत्रावर प्रश्न उपस्थित केले. मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीची प्रक्रिया माहीत असतानाही केवळ काही दिवस आधी पत्र लिहिण्यामागे नेमका उद्देश काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ‘मराठवाड्यातून आलेल्या अशा पत्रांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किती महत्त्व देतात, हे सगळा गाव जाणतो,’ असा थेट टोला दानवेंनी लगावला. त्याचवेळी त्यांनी या मुद्द्याला विदर्भाचा राजकीय संदर्भही जोडला. ‘हेच पत्र विदर्भातून आले असते, तर एव्हाना सगळी यंत्रणा पळत सुटली असती,’ असा दावा करत त्यांनी सरकारच्या प्राधान्यक्रमावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. बैठका घ्या म्हणण्यापेक्षा आधीच्या घोषणांची पूर्तता झाली का ते विचारा धनंजय मुंडे यांनी विशेष मंत्रिमंडळ बैठकीची मागणी करण्याऐवजी यापूर्वी मराठवाड्यासाठी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयांची अंमलबजावणी झाली आहे की नाही, याचा सरकारकडे जाब मागावा, असेही दानवेंनी म्हटले आहे. ‘या बैठका घ्या म्हणण्यापेक्षा झालेल्या घोषणांची पूर्तता झाली का म्हणून एकदा तरी जाब विचारा,’ असे दानवेंनी मुंडेंना सुनावले. हेही वाचा… महाराष्ट्रात पुन्हा पावसाची चाहूल:11 सप्टेंबरपासून जोर वाढणार, गणेशोत्सवाच्या काळात बरसण्याचा अंदाज महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने घेतलेली विश्रांती आता संपण्याची शक्यता आहे. राज्यात पुन्हा पावसासाठी पोषक वातावरण तयार होत असून, 11 सप्टेंबरपासून अनेक भागांत पावसाच्या सरी वाढण्याचा अंदाज आहे. भारतीय हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, 11 सप्टेंबरला विदर्भ आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे, तर 12 सप्टेंबरला पावसाचा विस्तार आणखी वाढणार आहे. विदर्भ आणि कोकणातील काही भागांसाठी 12 सप्टेंबरला जोरदार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
मराठवाड्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा, धनंजय मुंडेंचे फडणवीसांना पत्र:छत्रपती संभाजीनगरात विशेष मंत्रिमंडळ बैठकीची मागणी; अंबादास दानवेंची टीका