![]()
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील कसबा आणि विश्रामबाग वॉर्ड कार्यालयाच्या हद्दीतील प्रमुख मिरवणूक मार्गांची बुधवारी संयुक्त पाहणी करण्यात आली. नागरिक आणि भाविकांना सुरक्षित व सुरळीत सुविधा मिळाव्यात, हा या पाहणीचा उद्देश होता. आमदार हेमंत रासणे, महापालिका आयुक्त नवल किशोर राम आणि पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या उपस्थितीत ही पाहणी झाली. यात रस्ते, वाहतूक आणि इतर पायाभूत सुविधांचा आढावा घेण्यात आला. पाहणीची सुरुवात कसबा गणपती मंदिरापासून झाली. यात शिवाजी रोड, भाऊ रंगारी गणपती, तांबडी जोगेश्वरी, केळकर रोड, पासोड्या विठोबा मंदिर, सोन्या मारुती मंदिर, सोमेश्वर मंदिर, महाराणा प्रताप रस्ता, कस्तुरी चौक, फडगे पोलिस चौकी, मंडई गणपती, दगडूशेठ गणपती, गुरूजी तालीम, लक्ष्मी रस्ता आणि पुरम चौक या प्रमुख परिसरांचा समावेश होता. काँक्रीट आणि डांबरी रस्त्यांवरील खड्डे, महावितरणच्या केबलसाठी केलेल्या खोदाईनंतर अपूर्ण राहिलेली रस्ते दुरुस्ती, पदपथांची स्थिती आणि ड्रेनेजमधील गळती व तुंबलेल्या वाहिन्या याबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली. पादचाऱ्यांना अडथळा ठरणारे विद्युत डीपी बॉक्स आणि उघड्या तारांबाबत तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. कसबा, मंडई आणि स्वारगेट मेट्रो स्थानक परिसरात गणेशोत्सवात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील रस्ते खड्डेमुक्त ठेवण्यावर विशेष लक्ष देण्याचे निर्देश दिले. गणेशोत्सव संपेपर्यंत नवीन रस्ते खोदाई टाळावी आणि यापूर्वी केलेल्या खोदाईची कामे पूर्ण करून रस्ते समतल करावेत, असेही अधिकाऱ्यांना सांगण्यात आले. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महापालिका आणि पोलिसांनी समन्वयाने नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पाहणीदरम्यान, संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना गणेशोत्सवापूर्वी सर्व आवश्यक कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले गेले.
Source link
गणेशोत्सवापूर्वी मिरवणूक मार्ग खड्डेमुक्त करा:आमदार हेमंत रासणे, आयुक्त नवल किशोर राम आणि पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून संयुक्त पाहणी