Headlines

अतिरेकी धमक्यांना न जुमानता काश्मीरमध्ये गणेशोत्सव साजरा होणार:पुण्यातील मानाच्या गणपतींच्या मूर्ती काश्मीरमधील तीन मंडळांना प्रदान करण्यात आल्या




काश्मीर खोऱ्यात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या कार्यकर्त्यांना यंदा अतिरेकी संघटनांकडून जीवे मारण्याची थेट धमकी मिळाली आहे. मात्र, या धमकीला न जुमानता काश्मीरमधील गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी यंदाही धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्धार केला आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील मानाच्या गणपतींच्या मूर्ती काश्मीरमधील गणेश मंडळांकडे विधिवत पूजा करून सुपूर्द करण्यात आल्या. पुण्यातील युवा उद्योजक पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळांनी सलग पाचव्या वर्षी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. जवळपास ३४ वर्षे बंद असलेल्या काश्मीरमधील लाल चौकात २०२२ पासून सार्वजनिक गणेशोत्सवाला पुन्हा सुरुवात झाली. त्यानंतर गेली तीन वर्षे काश्मीर खोऱ्यातील विविध ठिकाणी उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. यंदा या उत्सवाला आणखी व्यापक स्वरूप देण्याचे नियोजन आहे. यंदाच्या गणेशोत्सवासाठी पुण्यातील मानाचा पहिला श्री कसबा गणपती, मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी आणि मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम यांच्या मूर्ती विधिवत पूजा करून काश्मीरमधील गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांकडे सुपूर्द करण्यात आल्या. या मूर्ती स्वीकारण्यासाठी काश्मीरमधील गणेश मंडळांचे मोहित भान, रिषभ चाकू, शिशंत चाकू, संदीप रैना, संजीव रैना, हितेश रैना आणि संदीप कौल हे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख व विश्वस्त पुनीत बालन, अलंकार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उल्हास कदम, गुरुजी तालीम मंडळाचे प्रविण परदेशी, तुळशीबाग मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, तांबडी जोगेश्वरी मंडळाचे प्रशांत टिकार आणि अखिल मंडई मंडळाचे सूरज थोरात हे उपस्थित होते. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे विश्वस्त व उत्सवप्रमुख पुनीत बालन म्हणाले, ‘काश्मीरमधील चार ते पाच जिल्ह्यांमध्ये यंदा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचे नियोजन होते. मात्र, गणेशोत्सव साजरा करणाऱ्या कार्यकर्त्यांना अतिरेकी संघटनांनी जीवे मारण्याची धमकी दिली. तरीही त्यांच्या या धमकीला न जुमानता आणि स्वतःच्या जीवाची पर्वा न करता गणेशोत्सव साजरा करण्याचा कार्यकर्त्यांचा उत्साह नक्कीच कौतुकास्पद आहे. त्यांच्या या धाडसाचं कौतुकच करायला पाहिजे.’



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *